Diabetes Patient In India: मधुमेहाबद्दल (Diabetes) अत्यंत महत्त्वाची बातमी. भारतात आताच्या घडीला 10 कोटीहून अधिक मधुमेहाचे रुग्ण (Diabetes Patient) आहेत. 2019 मध्ये ही संख्या 7 कोटी होती. म्हणजेच, केवळ चार वर्षांत 4 कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण झाली आहे. टक्केवारी पाहिली तर ही वाढ 44 टक्के इतकी आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, साडेतेरा कोटी नागरिक हे प्री-डायबेटिक (Prediabetes) आहेत. म्हणजेच, त्यातील एक तृतीयांश लोकांना कधीही मधुमेह होऊ शकतो. 


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian Council of Medical Research) अर्थात ICMRनं ही आकडेवारी ब्रिटनच्या लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे. गोवा (Goa), पुदुच्चेरी (Puducherry) आणि केरळ (Kerala) या राज्यांमध्ये मधुमेहाचं प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दर एका मधुमेह रुग्णामागे 4 प्री-डायबेटिक केसेस आहेत, अशी माहितीही लॅन्सेटमध्ये देण्यात आली आहे. लठ्ठपणा (Obesity), संथ जीवनशैली (Slow Lifestyle) आणि कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणं ही डायबेटीसची तीन प्रमुख कारणं आहेत. 


यूके मेडिकल जर्नल 'लॅन्सेट'मध्ये प्रकाशित झालेल्या ICMR च्या अहवालानुसार, भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या 101 दशलक्ष म्हणजेच, 10.1 कोटींहून अधिक आहेत. 2019 मध्ये, हे प्रकरण 70 दशलक्ष म्हणजे 7 कोटी होतं. काही विकसित राज्यांमध्ये ही संख्या स्थिर होत आहे, मात्र इतर अनेक राज्यांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसत आहे. अभ्यासात असं दिसून आलं आहे की, किमान 136 दशलक्ष (13.6 कोटी) लोक म्हणजेच, 15.3 टक्के लोकसंख्या प्री-डायबेटिक आहे. 


गोवा (26.4 टक्के), पुदुच्चेरी (26.3 टक्के) आणि केरळ (25.5 टक्के) मध्ये मधुमेहाचा सर्वाधिक प्रसार दिसून आला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या कमी प्रसार असलेल्या राज्यांमध्ये पुढील काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असं आयसीएमआरच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.


मद्रास डायबेटिक रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि अभ्यासाचे पहिले लेखक डॉ. रणजित मोहन अंजना यासंदर्भात बोलताना म्हणाले की, गोवा, केरळ, तामिळनाडू आणि चंदीगडमध्ये मधुमेहाच्या रुग्णांपेक्षा कमी प्री-डायबिटीज रुग्ण आहेत. पुद्दुचेरी आणि दिल्लीमध्ये, ते जवळजवळ समान आहेत आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की, तेथील रुग्णांची संख्या स्थिर होत आहे, परंतु मधुमेहाची कमी प्रकरणे असलेल्या राज्यांमध्ये, शास्त्रज्ञांनी प्री-डायबेटिक असलेल्या लोकांची संख्या जास्त नोंदवली आहे.