Navratri 2023 Recipes: उवासाकरता नेमकं काय बनवायचं? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच नवरात्रीचे (Navratri 2023) उपवास म्हणजे सलग 9 दिवस काय बनवायचं? हा विचार येतो. जर तुम्ही उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर यावेळी उपवासाला नवीन काहीतरी ट्राय करू शकता. तुम्ही वरई (Varai) आणि साबुदाण्यापासून (Sabudana) बनवलेलं स्वादिष्ट घावन बनवू शकता. पण ते कसं बनवायचं? यासाठीची रेसिपी जाणून घेऊया.


उपवासाचे घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य



  • 1 कप वरई

  • 1 कप साबुदाणा

  • 1 कप शेंगदाण्याचा कूट

  • 1 मोठा बटाटा

  • नारळ

  • हिरव्या मिरच्या

  • जिरे

  • मीठ

  • तूप किंवा तेल


उपवासाचे घावन बनवण्याची कृती



  • उपवासाचे घावन बनवण्यासाठी सर्वप्रथम साबुदाणा आणि वरई एकत्र 4 ते 5 तास भिजवून ठेवावे. 

  • पाण्याची पातळी साबुदाणा आणि वरईच्या वरती 2 इंचापर्यंत असावी.

  • साबुदाणा आणि वरई दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

  • वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरं, मीठ, शेंगदाण्याचा कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घालावे.

  • हे सर्व मिक्सरमधून बारीक करुन घेतल्यावर हे मिश्रण थोडा वेळ बाजूला काढून ठेवावं.

  • आता एक नॉनस्टीक तवा घ्यावा.

  • तव्यावर बाजूने तेल किंवा तूप सोडावं.

  • एक पळी मिश्रण तव्यावर पातळ पसरुन घ्यावं.

  • कडेने एक चमचा तेल सोडावं.

  • एक बाजू भाजली की दुसरी बाजू नीट भाजून घ्यावी.

  • मऊ आणि लुसलुशीत घावन तयार आहे.

  • हे गरमागरम घावन तुम्ही नारळाच्या किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता.


शारदीय नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व


नव म्हणजे नऊ आणि नवीन. शारदीय नवरात्रीपासून थंडीमध्ये निसर्ग रुप पालटतो. ऋतू बदलू लागतात. यामुळेच नवरात्रीच्या काळात भाविक संतुलित आणि सात्विक आहार घेतात, तसेच देवीचे चिंतन आणि ध्यानावर लक्ष केंद्रित करून स्वतःला आत्मशक्तिशाली बनवतात. त्यामुळे ऋतुबदलाचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. 


नवरात्र 9 दिवस का साजरी केली जाते?


शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होते आणि शेवटचा दिवस 'विजयादशमी' (दसरा) म्हणून साजरा केला जातो, ज्यामध्ये भगवान रामाने लंकापती रावणाचा पराभव केला. तसेच देवी दुर्गाने महिषासुराचा पराभव केला. एका पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गा मातेने महिषासुर या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि नंतर नवमीच्या रात्री त्याचा वध केला. तेव्हापासून देवी मातेला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून ओळखले जाते. तेव्हापासून, माता दुर्गेच्या शक्तीला समर्पित नवरात्री व्रत पाळताना, तिच्या 9 रूपांची पूजा केली जाते.


हेही वाचा:


Navratri 2023: यंदाच्या नवरात्रीत बनवा खमंग उपवासाचे अप्पे; पाहा बटाट्यांपासून बनलेल्या अप्प्यांची रेसिपी