Muscles Health : पिळदार शरीर, पोटाच्या स्नायूंची एकन्एक वळकटी दिसणे वगैरे बाहेरून दिसणारी वैशिष्ट्ये हेच सुदृढ आणि निरोगी स्नायूंचे लक्षण आहे, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, हे काही सर्वार्थाने खरे नाही. स्नायूंची सुदृढता (Muscles Health) ही केवळ या वरवरच्या गोष्टींपुरती मर्यादित नसते, तर त्यांचे महत्त्व त्याहूनही अधिक खोलवर रुजलेले आहे. शरीराची ताकद आणि आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण व समाधानी बनवणारी दैनंदिन कामे करण्याची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी स्नायूंचे निरोगी असणे अत्यंत महत्त्वाचे असते.
स्नायूंचे आरोग्य (Muscles Health) चांगले नसले तर, ज्या दैनंदिन कामांना आपण सहज गृहित धरून चालत असतो ती लहान लहान कामे करण्याची आपली क्षमताही हळूहळू कमी होत जाते. मग ते चालणे असो किंवा अगदी श्वास घेण्यासारखी हरक्षणी करायची कृती असो! डॉ. इरफान शेख यांच्या मते, आपले स्नायू बळकट आणि निरोगी ठेवायचे तर त्यासाठी पोषण आणि व्यायाम हे दोन प्रमुख आधारस्तंभ आहेत. पोषक आहाराची जोड नसेल तर अत्यंत खडतर व्यायामाचाही स्नायूंचे स्वास्थ्य राखण्याच्या दृष्टीने काहीही उपयोग होत नाही, असे मत ते मांडतात.
स्नायू कधीही आराम करत नाहीत!
स्नायू सतत कार्यरत असतात आणि आपल्या शरीराची हालचाल, संतुलन, ढब हे सगळं राखण्यासाठी, तसेच शरीराची ताकद आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ते शरीराला सतत आधार देत असतात. साधारणपणे तरुण व्यक्तींचे शरीर विघटनाच्या क्रियेमुळे होणारी झीज सहज भरून काढत असते. पण, वाढत्या वयाबरोबर या दोन गोष्टींमधील समतोल बिघडू शकतो. अगदी 40व्या वर्षापासूनच प्रत्येक दहा वर्षांमध्ये आपण आपल्या स्नायूंच्या एकूण वस्तूमानातील 8% भाग नष्ट होतो (Muscles Health). थकवा, ताकद आणि ऊर्जा कमी होणे, हालचाली मंदावणे आणि रोगप्रतिकारशक्तीचे कवच कमकुवत होणे ही स्नायूंचे आरोग्य उतरणीला लागण्याची सहज दिसून येणारी लक्षणे आहेत.
तुमच्या स्नायूंना हवा पोषणाचा खुराक
स्नायूंचे वस्तुमान म्हणजे मसल मास घटणे ही नैसर्गिक बाब आहे. पण, ही क्रिया वेगाने होऊ नये व त्याचे काही नकारात्मक परिणाम होऊ नयेत, याची काळजी आपण घेऊच शकतो. पोषण आणि स्नायूंचे आरोग्य या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. अखेर अन्नातूनच तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते आणि आपल्या स्नायूंच्या ताकद (Muscles Health) मिळते. पुरेसे पोषण आणि संतुलित आहार हे स्नायूंच्या आरोग्याला बळ देण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. पण एकाच प्रकारचे अन्न चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक पोषण पुरवू शकत नाही, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.
न्याहारीला प्राधान्य द्या
वेळेच्या अभावी आपण बऱ्याचदा नाश्ता घेणे टाळतो. पण, दिवसभराच्या कामांसाठी शरीराला लागणारी ऊर्जा पुरवणारा पोषणाचा सगळ्यात शक्तिशाली साठा नाश्त्यामधूनच मिळतो. सकाळच्या वेळी अंडी, दुग्धजन्य पदार्थ, अखंड धान्ये आणि फळे अशा पोषक घटकांची रेलचेल असलेल्या पदार्थांचा सर्वांगीण आहार घेतल्याने पोटही भरते आणि शरीरातील ऊर्जेची पातळी वर जाते. पनीर, ट्यूना मासा, डाळी आणि बदाम हे त्यासाठीचे काही चांगले पर्याय आहेत.
शारीरिक व्यायामासाठीचा वेळ राखून ठेवा
नियमित शारीरिक व्यायाम स्नायूंना बळकटी देण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी सुरुवातीला तुम्ही आपल्या दिनचर्येमध्ये चालणे, पोहणे, सायकलिंग, जॉगिंग, वेटलिफ्टिंग, मनोरंजनात्मक खेळ किंवा अगदी पायऱ्या चढण्या-उतरण्यासारख्या साध्या व्यायामांचा समावेश करू शकता. व्यायामासाठी अगदी तासभर वेळ काढला तरीही स्नायूंची ताकद आणि आरोग्य टिकवण्यासाठी त्याचे प्रचंड योगदान मिळू शकते.
प्रथिनांची दैनंदिन गरज पूर्ण होईल याची काळजी घ्या
प्रत्येक भोजनामध्ये 20 ते 30 ग्रॅम प्रथिनांचा समावेश केल्यास स्नायूंची होणारी झीज भरून काढण्यासाठी त्यांची मदत होऊ शकेल. मांस, पोल्ट्री, मासे, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, टोफू आणि शेंगा यांसारखे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने शरीराला निर्धारित प्रमाणात प्रथिने मिळू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
महत्वाच्या बातम्या :