Monsoon Care : पावसाळा म्हटला की वातावरणात गारवा, निसर्ग बहरतो, एक आल्हाददायक वातावरण सर्वत्र निर्माण होते. यासोबतच पाऊस येताना त्याच्यासोबत विविध आजारही घेऊन येतो. तसं पाहायला गेलं तर पावसाळ्यात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट होते. थोडा जरी पाऊस झाला तरी विविध भागात पाणी भरलेले दिसते. रस्ते पाण्याने तुडुंब भरले असल्याने नागरिकांना कुठेही ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, दैनंदिन कामकाजामुळे लोकांना त्या पाण्यातून कसेबसे जावे लागते, पण तुम्हाला माहिती आहे का? की या पाण्याच्या संपर्कात आल्याने तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या होऊ शकतात. होय, पावसामुळे रस्त्यावर तुंबलेले पाणी तुम्हाला आजारी बनवू शकते. पावसाळ्यात साचलेल्या घाण पाण्याच्या संपर्कात येऊन तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. या संदर्भात एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार डॉ. रिमी डे यांनी काही माहिती शेअर केली.


 


पावसाच्या पाण्यामुळे होणारे आजार


डॉक्टर म्हणाले की, पावसामुळे साचलेल्या घाण पाण्यात भिजल्याने आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात. अनेक धोकादायक जीवजंतू, जीवाणू आणि विषाणू साचलेल्या पाण्यात वाढतात, जे आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. त्यातच, मुंबईतील विविध भागात पाऊस पडताच नाल्यातील पाणीही वाहू लागते, ज्यामुळे हा धोका आणखी वाढतो. त्यामुळे या पाण्याच्या संपर्कात आल्याने अनेक समस्या निर्माण होतात.


 


स्किन इन्फेक्शन


साचलेल्या घाणेरड्या पाण्यात निर्माण होणाऱ्या जीवाणूंमुळे त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ होणे, खाज सुटणे आणि संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्वचा लाल आणि सुजलेली दिसू लागते.


 


पचन समस्या


पावसामुळे साचलेल्या पाण्यात E. coli आणि Vibrio सारखे रोगजंतू मोठ्या प्रमाणात असतात. चुकून हे पाणी शरीरात गेल्यास जुलाब, उलट्या, पोटदुखी अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. हा संसर्ग लहान मुले आणि वृद्धांमध्ये आणखी धोकादायक रूप धारण करू शकतो.


 


श्वसन समस्या


घाणेरड्या पाण्यातील कणांमुळे श्वसनमार्गाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे खोकला, सर्दी आणि काही प्रकरणांमध्ये न्यूमोनियासारख्या गंभीर समस्यांचा धोका असतो.


 


डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया


साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, झिका विषाणू यांसारखे आजार पसरतात. त्यामुळे साचलेल्या पावसाचे पाणी संपर्कात आले की ते धोकादायक ठरू शकते.


 


या आजारांना कसे टाळायचे?



  • या आजारांना टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे घाणेरड्या पाण्याशी थेट संपर्क टाळणे, परंतु जर तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

  • बाहेर जाण्यापूर्वी वॉटर प्रूफ कपडे आणि बूट घाला, जेणेकरून पाणी तुमच्या शरीरात पोहोचणार नाही.

  • घरी येताच सर्वप्रथम आपले ओले कपडे काढा आणि चांगली आंघोळ करा जेणेकरून त्वचेवरील घाण साफ होईल. तसेच, ते ओले कपडे इतर कपड्यांपासून वेगळे धुवा.

  • पावसाचे घाणेरडे पाणी चुकून तुमच्या तोंडात, नाकात, डोळ्यात किंवा कानात गेले तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून संसर्गाचा धोका कमी होईल.

  • तुमच्या घराच्या आजूबाजूच्या नाल्यांची स्वच्छता करा, कचरा साचू देऊ नका आणि काही खड्डे असल्यास ते दुरुस्त करा.


 


हेही वाचा>>>


काय सांगता..! आता धूम्रपान न करणाऱ्यांनाही Lung Cancer चा धोका? कसा होतो हा कर्करोग? एका अभ्यासातून खुलासा


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )