Momos May Cause Diabetes : फास्ट फूड (Fast Food) म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अलिकडच्या काळात मोमोजची (Momos) क्रेझ वाढताना दिसत आहे. अलिकडच्या काळात मोमोज सर्वात जास्त विक्री होणारं स्ट्रीट फूड (Street Food)  आहे. प्रत्येक चौकात मोमोजचे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात आणि अगदी लहान मुलं, तरुणाई किंवा मोठी मंडळी सर्वजण मोमोजवर ताव मारताना दिसतात. तुम्हीही आवडीने मोमोज खात असाल, तर थांबा आणि ही बातमी वाचा.


आवडीने मोमोज खाताय तर सावधान!


मोमोज मधुमेह रुग्णांसाठी (Diabetic Patients) विषापेक्षा कमी नाहीत. मोमोज रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे डायबिटीक रुग्णांसाठा रुग्णांसाठी मोमोज अधिक धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मोमोज अतिशय वेगाने मधुमेहाला चालना देतात आणि रुग्णाची स्थिती गंभीर होण्यास कारणीभूत ठरू शकतात. बाजारात विकले जाणारे बहुतांश मोमोज हे पिठापासून बनवले जातात. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या, चीज आणि मांसाहारी वस्तूंचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


मोमोजमध्ये अनेक रसायनांचा वापर


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमोज बनवताना त्यामध्ये विविध प्रकारची रसायने मिसळली जातात, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मोमोज मऊ करण्यासाठी त्यामध्ये सुमारे 3 प्रकारची रसायने मिसळली जातात, ही रसायने आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. एम्स रांचीचे न्यूरो सर्जन डॉ. विकास कुमार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, मोमोज पांढरा आणि मऊ बनवण्यासाठी त्यात ब्लीच, क्लोरीन आणि बेंझॉयल पेरोक्साइड ही रसायने मिसळली जातात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी या तीन गोष्टी अत्यंत घातक आहेत. 


मोमोजमुळे 'या' गंभीर आजाराचा धोका


त्यांनी पुढे सांगितलं की, मोमोजमध्ये वापरली जाणारी ही रसायने आपल्या शरीरातील इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींशी समन्वय साधत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवतात. त्याशिवाय मोमोजचा सुगंध आणि चव वाढवण्यासाठी त्यात मोनोसोडियम ग्लूटामेट सारख्या रसायनांचा देखील वापर केला जातो, ज्यामुळे आपल्या स्वादुपिंड आणि मूत्रपिंडांना नुकसान होऊ शकते. यामुळे मोमोज मधुमेह रुग्णांसाठी विष असल्याचं तज्ज्ञ सांगतात, इतकंच नाही तर मोमोजच्या अतिसेवनामुळे एखाद्या निरोगी व्यक्तीलाही मधुमेह होण्याचा गंभीर धोका संभवतो.


मोमोज खाताना 'ही' काळजी घ्या


अमेरिकन डायटेटिक असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णाने आठवड्यातील काही दिवस मोमोज खाल्ले तर त्याचा आरोग्यावर विशेष परिणाम दिसून येत नाही, पण दररोज आणि मर्यादेपेक्षा जास्त मोमोज खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते, असं निदर्शनास आलं आहे. मधुमेही रुग्णांनी मोमोज खाल्ले तरी त्यांनी स्टीम मोमोजच निवडावेत. मैदा, नाचणी, बाजरी इत्यादी वस्तू बनवलेले मोमोज खाणं उत्तम ठरेल, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


मूळव्याध आणि पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका


तज्ज्ञांच्या मते, ज्या लाल चटणीसोबत मोमोज खाल्ले जातात ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. या चटणीमध्ये लाल मिरचीचा आणि रसायनिक रंगाचा वापर केला जातो. या चटणीमुळे मूळव्याध आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. तर मोमोजसोबतच्या पांढऱ्या चटणीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाच्या रुग्णांसाठी नुकसानकारक ठरु शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी विशेषतः बाहेरील मोमोज खाणे टाळावेत, त्यांनी घरी ताज्या भाज्यांपासून बनवलेले मोमोज खाणं आरोग्यासाठी उत्तम राहील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Gut Health : आतड्यातील सामान्य बॅक्टेरियामुळे अल्जाइमरचा धोका, वेळीच सावध व्हा, अन्यथा...