Covid-19 JN.1 Variant : देशातील कोरोना संसर्ग (Coronavirus) दिवसागणिक वाढताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या (Corona Outbreak) संख्येत वाढ झाली आहे. त्यातील बहुतेक रुग्ण नवीन JN.1 सब-व्हेरियंटचे (Covid Omicron JN.1 Sub-Variant) असल्याने चिंता वाढली आहे. नवीन वर्षात पुन्हा कोरोना संसर्गाला वेग आल्याने प्रशासन अलर्टवर आहे. AIIMS व्यवस्थापनाच्या कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गंभीर तीव्र श्वसन संक्रमण (SARI) असलेल्या रूग्णांची कोविडची चाचणी केली जाईल. यामध्ये तीव्र श्वसन संक्रमण, सतत ताप येणे किंवा 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असणे, सतत 10 दिवसांपेक्षा जास्त काळ ताप असणे अशा रुग्णांची कोविड चाचणी केली जाईल. 


JN.1 व्हेरियंटचा वाढता धोका


तज्ज्ञांच्या मते, कोविड -19 च्या विविध व्हेरियंटमुळे कोविड विषाणूच्या लक्षणांमध्ये बदल पाहायला मिळत आहे. भारतातील बहुतेक नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस मिळाले आहेत. अनेकांनी बूस्टर डोसही घेतला आहे. प्रत्येक शरीर आणि त्याची प्रतिकारशक्ती यावर कोरोना विषाणूचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णांचा प्रतिकारशक्तीवर रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसू शकतात. 


काळानुसार कोविड विषाणूच्या लक्षणांमध्ये बदल


कोरोना महामारी पसरल्यापासून व्हायरसमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. काळानुसार, कोरोनाचे वेगवेगळे प्रकारही समोर आले आहेत. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) ने 8 डिसेंबर रोजी एका अहवालात म्हटलं की, 'JN.1 व्हेरियंटची लक्षणे किती गंभीर आहेत, हे त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती आणि आरोग्यावर अवलंबून असते.' यूकेच्या आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, कोरोनाच्या JN.1 सब-व्हेरियंटने संक्रमित रुग्णांमध्ये काही लक्षणे नोंदवण्यात आली आहेत. ही लक्षणे कोणती, जाणून घ्या.


JN.1 सब-व्हेरियंटची लक्षणे



  • घसा खवखवणे

  • निद्रानाश

  • सर्दी

  • खोकला

  • डोकेदुखी

  • अशक्तपणा किंवा थकवा

  • स्नायू दुखणे


यूकेच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, थकवा आणि डोकेदुखी ही काही सामान्य लक्षणे आहेत पण ही इन्फ्लूएंझाची लक्षणे देखील असू शकतात. त्यामुळे लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करुन घ्या.


नवीन प्रकारामुळे किरकोळ लक्षणांमध्ये होणारे बदल हे लसीकरणातून मिळालेल्या प्रतिपिंडांमुळे होते की जुन्या संसर्गामुळे हे सांगणे कठीण आहे. बहुतेक लोकांमध्ये खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे दिसून येत आहेत.