Corona Vaccine : देशभरात सर्व ठिकाणी covid 19च्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. आणि काही लोकांचा लसीकरणाचा पहिला डोस घेऊन झाला आहे. लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्यालादेखील 1 मार्च पासून सुरुवात होत आहे. यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. त्यासोबतच 45 वर्षांवरील रुग्ण व्यक्तींनाही लस देण्यात येणार आहे. अशातच लसींची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आयटी क्षेत्रातील इंफोसिस आणि सॉफ्टवेयर कंसल्टिंग फर्म एक्सेंचर या दोन दिग्गज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या सीईओंनी दिली माहिती

इंफोसिसचे सीईओ प्रविण राव यांनी सांगितले की, "कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लसीकरणासाठी हेल्थोकोयर प्रोवायडर्ससोबत पार्टनरशीप करु शकते. तसेच ते आपल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या covid 19 लसीचा पूर्ण खर्च स्वत: करणार आहेत.

इतर कंपन्याही करणार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च

सॉफ्टवेयर कंसल्टिंग फर्म एक्सेंचरच्या भारतातील चेअरपर्सन रेखा मेनन यांनी सांगितले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या covid 19 लसीचा पूर्ण खर्च स्वत: करणार आहेत. भारतात कंपनीचे 2 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. याव्यतिरिक्त महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीनेही सांगितले की, ते आपल्या कर्मचाऱ्यांचा covid 19 लसीचा पूर्ण खर्च करणार आहेत.

covid 19 लस ही सरकारी रुग्णालयात मोफत देण्यात येत आहे. तर खासगी रुग्णालयात तिची किंमत 250 रुपये आहे. ज्यात 150 रुपये लसीची किंमत आणि 100 रुपये अॅडमिनिस्ट्रेटिव चार्ज आहेत.