What Is Alaska Pox Virus: गेल्या नऊ वर्षांपासून अलास्कातील फेअरबँक्स परिसरात आढळून आलेला एक व्हायरस आरोग्य विभागासाठी डोकदुखी ठरतोय. या व्हायरसमुळे अनेक आजार होतात. मात्र, अलिकडेच राज्यातील आणखी एका भागात या व्हायरसमुळे (Alaska Pox Virus) एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर व्हायरसची चिंता वाढली आहे. 'अलास्कापॉक्स व्हायरस' असं या व्हायरसचं नाव आहे.
अलास्कापॉक्स म्हणजे काय?
अलास्कापॉक्स विटांच्या आकाराच्या व्हायरसच्या कुटुंबाशी संबंधित आहे, जे प्राणी आणि मानवांना संक्रमित करू शकतात. ऑर्थोपॉक्स व्हायरस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या व्हायरसमुळे त्वचेवर जखमा होतात किंवा त्वचेला खाज येते. प्रत्येक व्हायरसची स्वतःची वैशिष्ट्य असतात, त्यापैकी काही वैशिष्ट्य अत्यंत घातक असतात.
स्मॉलपॉक्स हा बहुधा सर्वसाधारणपणे माहीत असलेला व्हायरस आहे. या विषाणूच्या कुटुंबात कॅमलपॉक्स, काउपॉक्स, हॉर्सपॉक्स आणि mpox या व्हायरसचा समावेश होतो. MPox व्हायरस पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखला जायचा. अलास्काच्या फेअरबँक्सजवळ राहणाऱ्या एका महिलेमध्ये 2015 मध्ये अलास्कापॉक्सचा शोध लागला होता. हा व्हायरस प्रामुख्यानं लहान सस्तन प्राण्यांमध्ये आढळून येतो. ज्यात लाल पाठ असणाऱ्या आणि चिंचुदरी यांचा समावेश होतो. परंतु आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, कुत्रा आणि मांजर यांसारख्या पाळीव प्राणी देखील या व्हायरसचे कॅरिअर असू शकतात. अलास्कामध्ये गेल्या नऊ वर्षांत सात जणांना या व्हायरसची लागण झाली आहे.
अलास्कापॉक्सची लक्षणं
अलास्कापॉक्स असलेल्या लोकांना त्वचेवर एक किंवा अधिक चट्टे किंवा पूरळ येतात. त्यांचे सांधे किंवा स्नायू दुखणं आणि लिम्फ नोड्स सुजतात. या व्हायरसची लागण झालेल्या काही रुग्णांमध्ये बऱ्याचदा सौम्य लक्षणं दिसून येतात आणि काही काळानं ती बरीही होतात. पण जर रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर मात्र, लोकांना गंभीर आजाराचा धोका असू शकतो.
अलास्कापॉक्सचा प्रसार कसा होतो?
अलास्कामधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलास्कापॉक्स संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून पसरतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या आजाराची लक्षणं पसरल्याचं अद्याप कोणतंही उदाहरण समोर आलेलं नाही. परंतु एखादी व्यक्ती ज्यावेळी अलास्कापॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीच्या स्किन इन्फेक्शनच्या संपर्कात येते, त्यावेळी आरोग्य अधिकारी अलास्कापॉक्स झालेल्या व्यक्तीला आपल्या जखमा पट्टीनं झाकण्याचा सल्ला देत आहेत. आतापर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांना व्हायरसची लागण झालेल्या 7 रुग्णांची माहिती आहे. यातून अलिकडेच एकाचा मृत्यू झाला आहे.
प्रकरण काय?
केनाई मध्ये राहणारा एक वृद्ध व्यक्ती कर्करोगावर उपचार घेत होता. आजारपणामुळे त्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली होती. सप्टेंबरमध्ये, त्याला उजव्या काखेखाली लाल जखम दिसली आणि त्याला थकवा, जळजळ झाल्यामुळे पुढील दोन महिन्यांत डॉक्टरांना भेट दिली. अलास्का सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या गेल्या आठवड्यातील बुलेटिननुसार त्यांना नोव्हेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि गेल्या महिन्यात त्यांचं निधन झालं. असं सांगितलं जात आहे की, हा माणूस दुर्गम जंगलात राहत होता आणि प्रवास करत नव्हता. लहान प्राण्यांची शिकार करणाऱ्या भटक्या मांजरीनं त्याला ओरखडलं होतं, असं सांगितलं.