मुंबई : अनेकदा लोक व्यस्त जीवनशैलीमुळे झोपेच्या बाबतीत तडजोड करतात. पण झोप आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. 7 ते 9 तास झोप पुरेशी मानली जाते. दरम्यान, एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. एका डॉक्टरच्या पोस्टने झोप आणि त्याचं महत्त्व याबाबत नवी चर्चा रंगली आहे आणि ते किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे. हैदराबादच्या न्यूरोलॉजिस्टने आपल्या पोस्टमध्ये असा दावा केला आहे की जर एखाद्या व्यक्तीने फक्त एक तासाची झोप गमावली तर त्यातून होणारी झीज भरून काढण्यासाठी बरेच दिवस लागतात. या पोस्टकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.


एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक


हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ सुधीर कुमार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, “जर तुमची फक्त एक तासाची झोप कमी झाली तर ती बरी होण्यासाठी चार दिवस लागू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात, ज्यात डोकेदुखी, कमी लक्ष केंद्रित करणे, चिडचिड वाढणे आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील प्रभावित होते. डॉ.कुमार यांच्या व्हायरल झालेल्या पोस्टमुळे झोप न लागल्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांवर चर्चेला उधाण आले आहे.  


नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस


ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर डॉ. सुधीर यांचा सल्ला घेण्यासाठी सोशल मीडियावर तुफान गर्दी झाली होती. डॉ. सुधीर कुमार 1994 पासून या व्यवसायात आहेत. अनेकांनी डॉक्टरांना कमेंट करत ऑनलाईन सल्ला विचारला. एका यूजरने लिहिले की, "रात्री झोपेच्या वेळेत झालेली घट दिवसा झोपेने भरून काढता येईल का?" न्यूरोलॉजिस्ट म्हणाले, नक्कीच. रात्री एका वेळी 7 ते 9 तास झोपणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण, जर एखाद्या व्यक्तीला रात्री पुरेशी झोप घेत येत नसेल तर तो दिवसा झोपून झोपेची कमतरता भरून काढू शकतो.






 


दुसऱ्या युजरने विचारले की, “झोपण्यासाठी तयार होण्याचे सर्व नियम पाळले तरीही, मी दररोज काही तासांची झोप गमावतो. आणखी एकाने लिहिलं आहे की, मी ॲक्टिव्ह असलो तरीही, मला 5 तासांपेक्षा जास्त झोपेची आवश्यकता नाही. चौथ्याने लिहिलं आहे, झोप हे खरोखरच जीवनाचे अमृत आहे.जर एखाद्या व्यक्तीने फक्त एक तासाची झोप गमावली तर त्यातून होणारी झीज भरून काढण्यासाठी बरेच दिवस लागतात.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )