Knee Transplant Surgery: वाढत्या वयात सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे, गुडघेदुखी. अनेकजण यामुळे हैराण आहेत. गुडगेदुखीमुळे एवढा त्रास होतो की, ना झोपू शकत, ना काम करू शकत. अशावेळी अनेकदा डॉक्टरांकडून गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. जर सततच्या गुडघेदुखीमुळे (Knee Pain) त्रस्त झाला असाल आणि त्याचा परिणाम कामावर, सोशलायझिंगवर, झोपेवर किंवा इतर दैनंदिन कामांवर होत असेल, तर गुडघ्यांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. व्यायाम आणि औषधं यांसारखे पर्याय वापरून झालेल्या पण त्यांचा उपयोग न झालेल्या रुग्णांसाठी गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो. महत्त्वाची बाब म्हणजे, गुडघे प्रत्यारोपणतज्ज्ञाच्या सल्ल्यानेच शस्त्रक्रिया करुन घ्या. यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात सविस्तर...
गुडघेदुखीचा त्रास असलेले अगदी बेजार झाल्याचं पाहायला मिळतं. गुडघेदुखी थांबविण्यासाठी गुडघा प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये गुडघ्याची खराब झालेली कूर्चा आणि हाड प्रत्यारोपणतज्ज्ञ काढून टाकतात आणि कृत्रिम भाग बसवतात. गुडघ्याची ऑर्थोप्लास्टी किंवा गुडघे प्रत्यारोपण केल्यानं रुग्णाच्या दैनंदिन हालचाली सुलभ होतात, वेदना आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत होते आणि संबंधित व्यक्तीच्या जीवनमानाचा दर्जा उंचावतो. पण तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता येत नाही. तुमची काही निकषांवर तपासणी केली जाते आणि मगच गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करवून घेण्यास सांगितलं जाईल.
हाउस ऑफ डॉक्टर्स येथील क्रीडा अस्थिविकार आणि खांदे शल्यचिकित्सक डॉ. राहुल मोदी यांनी संबंधित लेखात गुडघे प्रत्यारोपणाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
गुडघे प्रत्यारोपण करण्याची योग्य वेळ कोणती?
जर वेदना तीव्र असेल, सांध्यांमध्ये पुरेशी ताकद नसेल, गुडघेदुखीमध्ये अवघडत चालावं लागत असेल, स्नायू आणि अस्थिबंध कमकुवत झाले असतील, दैनंदिन कामं करण्यात अडचण येत असेल, नैराश्य आलं असेल, हालचालींवरील बंधनांमुळे मानसिक ताण आला असेल, तर तुम्हाला गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेण्याची गरज आहे.
गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या आधी काय होतं?
गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कशी असते, याची माहिती तुम्हाला प्रत्यारोपणतज्ज्ञ देतात. गुडघे प्रत्यारोपणाबद्दल असलेल्या शंकांचं निरसन करतात आणि गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तुम्ही तयार आहात का? हे पाहण्यासाठी तुमची सखोल तपासणी करण्यात येते.
गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे फायदे?
गुडघेदुखीमुळे तुम्हाला थोडं अंतर चालणं, पायऱ्या चढणं, खाली बसणं, खुर्चीतून उठणं कठीण जाते. म्हणूनच गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे गुडघेदुखी आणि गुडघ्यातील ताठरपणा कमी होऊन तुम्हाला सर्व हालचाली सहजपणे करण्यास मदत होतं. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे ओपिऑइड पेनकिलर आणि भविष्यात गुंतागुंत निर्माण करणाऱ्या स्टेरॉइड्सची गरज कमी होते.
निष्कर्ष : कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी तज्ज्ञांकडून तुमची गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घ्या. डॉक्टरांनी दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं हिताचं असतं. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारल्यावर गुडघ्यावर ताण येणाऱ्या हालचाली करू नका.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Grapes Benefits For Health : आरोग्यदायी गुणधर्मांचा खजिना द्राक्षं; जास्त विचार करू नका बिनधास्त खा!