मुंबई : कोरोनामुळे अवयवदान मोहिमेला फटका बसत असला तरी गेल्या सहा महिन्यात मुंबई विभागात 18 मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले आहे आणि त्यातून मिळालेल्या अवयवांच्या आधारे प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांना अवयवांचा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी हाताचे सुद्धा प्रत्यारोपण होऊ शकते आणि हा अवयव दान होऊ शकतो, याबद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र, 2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर गेल्यावर्षी हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयात झाली आणि ती यशस्वीही झाली. त्यामुळे हात गमावलेल्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या. त्याचाच प्रत्यय म्हणजे मेंदूमृत अवयव मिळविण्याच्या मुंबई येथील प्रतीक्षायादीत पाच व्यक्तींनी हातच्या प्रत्यारोपणासाठी नाव नोंदणी करून ठेवली आहे. नुकतेच मुंबईत एक मेंदूमृत अवयवदान पार पडले. त्यात इतर अवयवांबरोबर प्रथमच महाराष्ट्रात मुंबईत दोन्ही हाताचे अवयवदान करण्यात आले आहे.
परळ येथील केइएम रुग्णालयात 21 वर्षाच्या तरुणावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून तब्बल 13 तास या शस्त्रक्रियेकरिता लागल्याचे सांगण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जन डॉ. विनिता पुरी यांनी या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व केले आहे.
राज्यात अवयव दान करण्यासंदर्भातील प्रक्रियेवर देखभाल करण्यासाठी स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्था आहे, त्या खालोखाल चार विभागीय संस्था आहे, त्यात चार झोनल ट्रान्सप्लान्टेशन को-ऑर्डिनेशन कमिटी (मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद) अशा आहेत. त्यापैकी मुंबई येथील झोनल ट्रान्सप्लान्टेशन को-ऑर्डिनेशन कमिटीच्या प्रतीक्षा यादीवर 5 व्यक्तींनी हात मिळावेत म्हणून आपले नाव प्रतीक्षायादीवर नोंदणी केलेले आहे. यापूर्वी आपल्याकडे राज्यातील झोनल ट्रान्सप्लान्टेशन को-ऑर्डिनेशन कमिटीच्या प्रतीक्षा यादीवर सर्वसाधारणपणे किडनी, यकृत, स्वादुपिंड, हृदय, फ्फुफुस, या अवयवांसाठी नोंदणी होत असे. मात्र, आता हातासाठी रुग्णांनी नाव नोंदविण्यास सुरुवात केली आहे.
केरळ राज्यात 5-6 व्यक्तीवर हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच पॉण्डेचेरी आणि चेन्नई येथे अशा प्रकारे हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र हाताच्या अवयवदानाविषयी लोकांमध्ये खूप गैरसमज आहे आणि मोठ्या प्रमाणात या विषयी जनजागृतीची गरज आहे.
2014 साली रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया 28 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली. याकरिता 32 वर्षीय एका मेंदूमृत व्यक्ती कडून तिला हे हात मिळाले असून ते चेन्नईवरून येथे आणण्यात आले होते. दोन वर्षांपासून मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला हात मिळावेत म्हणून नाव प्रतीक्षा यादीत टाकून ठेवले होते. तोपर्यंत तिला 'प्रोस्थेसिस लावण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया परळ येथील ग्लोबल रुग्णलयात पार पडली असून त्याकरिता 15 तासाचा अवधी लागला असून 35-40 डॉक्टरांचा यामध्ये सहभाग होता. डॉ. निलेश सातभाई यांनी ह्या संपूर्ण शस्त्रक्रियांचे नेतृत्व केले असून मायक्रोव्हयस्कुलर, ऑर्थोपेडिकस, प्लास्टिक सर्जन आणि ऍनेस्थेसिस्ट या विविध विषयातील तज्ञांचा या टीम मध्ये समावेश होता. तिच्या दोन्ही हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आज या घटनेला वर्ष पूर्ण होत आहेत.
13 ऑगस्ट, जागतिक अवयवदानाचे औचित्य साधून औरंगाबाद येथील एमजीएम संस्थेच्या मदर तेरेसा नर्सिंग महाविद्यालयात 'हाताचे अवयवदान' या विषयवार चर्चा सत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये मोनिकाच्या हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे ग्लोबल रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉ. निलेश सातभाई हे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी प्रेरणा दळवी यांनी या कार्यक्रमात अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले असून हा कार्यक्रम या महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरून दुपारी 10 ते 12 या वेळेत थेट प्रेक्षेपण करण्यात येणार आहे.