International Womens Day 2024: आज जागतिक महिला दिन (International Womens Day 2024)... तुम्हा-आम्हा सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'ती'च्या सन्मानाचा दिवस. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपापलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. पण आजही काही बाबतीत स्त्रियांना झगडावं लागतंय. आजच्या विकसनशील भारतात आजही स्त्रियांना काही बाबतीत स्पष्ट बोलण्याचं किंवा खुलेपणानं आपलं मत मांडण्याचं अधिकार नाही. त्यापैकीच एक विषय म्हणजे, मासिक पाळी (Menstrual Cycle). 


मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आजही याबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आहे. अनेक सेवाभावी संस्था आणि सरकारकडून सातत्यानं जनजागृती करुनही मासिक पाळी बाबतीत अनेक अंधश्रद्धा अजूनही आहेत. अशातच एका सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या 20 टक्के महिला अजूनही मासिक पाळीत कापड वापरतात. हे आम्ही नाही, तर 'राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5' मध्ये समोर आलं आहे. 


अनेक महिला सॅनिटरी पॅड्सपासून वंचित 


आज 'जागतिक महिला दिन' आपण उत्साहात साजरा करतोय. पण काही महिलांना अजूनही आरोग्य जगण्यासाठीच्या आवश्यक सुविधा मिळत नाहीत. आजही समाजातील प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत मासिक पाळी आणि त्याबाबत अनेक गैरसमज आहेत. दारिद्र्य रेषेखालील महिलांना, दररोज छोटा-मोठा व्यवसाय करून हातावर पोट भरणाऱ्या महिलांना दोन वेळचं जेवण परवडत नाही. तर दुकानात जाऊन सॅनिटरी पॅड्स विकत घेणं तर लांबचीच गोष्ट. काही वर्षांपूर्वी सरकारकडून सॅनिटरी नॅपकिन वरचा टॅक्स माफ करण्यात आला. मात्र, अजूनही नॅपकीनचे दर सगळ्यांना परवडतीलच असं नाही. 


महिलांचं सक्षमीकरण करणं अत्यंत गरजेचं 


मासिक पाळी (Menstrual Cycle) दरम्यान प्रत्येक महिलेनं स्वच्छतेबाबत जागरुक राहणं गरजेचं आहे. तसेच, या दिशेनं महिलांचं सक्षमीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आजही भारतात अशी अनेक गावं आहेत, जिथे महिलांना सॅनिटरी पॅड मिळत नाहीत. 


दरम्यान, आज जागतिक महिला दिन. खरंतर प्रत्येक दिवस हा महिलांचा दिवस आहे, म्हणून हा दिवस साजरा करायला हवाच. पण परिस्थिती काहीशी वेगळी आहे. राज्यातील अनेक महिला अजूनही मासिक पाळीत कापड वापरतात. राष्ट्रीय आरोग्य कुटुंब सर्वेक्षण 5 मध्ये असं सांगितल आहे की, महाराष्ट्रातील 20 टक्के महिला अजूनही कापड वापरतात. मासिक पाळीत स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. कापड वापरल्यानं त्या बरोबर होणारे आजार देखील त्यांना होतात. त्यामुळे मासिक पाळीबाबत अजून जनजागृती होणं आवश्यक आहे.  


आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण सर्व महिलांनी एक शपथ घेतलीच पाहिजे की, "मी Menstrual Hygiene ची काळजी घेणार". होय, ही शपथ केवळ राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देश भरातील स्त्रियांनी घेणं आवश्यक आहे. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या बातम्या :


What Is Sleep Paralysis: रात्री झोपेत 'ही' लक्षणं जाणवत असतील, तर वेळीच सावध व्हा; नाहीतर, तुम्हीही स्लिप पॅरालिसिसला बळी पडू शकता!