Heart Attack :  मागील दोन वर्षात हृदयविकार (Heart Attack) आणि कार्डिएक अरेस्टच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी वयाची 50 शी ओलांडल्यानंतर हृदयविकार असल्याचे आढळून येत होते. मात्र, बदलत्या जीवनशैलीने आता 18-20 वर्षांच्या मुलांमध्ये हृदयविकार बळावत असल्याचे समोर आले आहे. फिटनेसकडे लक्ष देणारी मंडळींना देखील हृदयविकाराचा झटका येत आहे.  


हृदयविकाराच्या झटक्याचे कारण


हृदयविकाराचा झटका येण्यामागे एकच नाही तर अनेक कारणे आहेत, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जीवनशैली. तरुणांचे कामाचे तास वाढले असल्याने अनेकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्याशिवाय, कुटुंबांपासून दूर राहणाऱ्या युवकांचे आणखीच हाल होतात. एकटे राहत असलेले युवक हे फास्ट फूडवर अवलंबून असतात. कामाचा ताण वाढल्याने धूम्रपान किंवा मद्यपान केल्याने त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. 


अनेक वेळा अनुवांशिकतमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. सध्याच्या जीवनशैलीत शारीरिक हालचाली जवळपास नगण्य झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्याशिवाय वाढलेला ताण हलका करण्यासाठी, मन मोकळं करण्यासाठी जवळपासच्या व्यक्ती नसल्याने अनेकजण मानसिक तणावात असतात.


हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काय करावे


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, व्यायाम किंवा आहाराव्यतिरिक्त झोप न लागणे, तणाव, रक्तदाब, साखर यांचाही हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, नियमित व्यायाम करण्याव्यतिरिक्त, जर तुम्ही झोप, रक्तदाब, साखर, तणाव आणि आहाराबाबत निष्काळजी असाल, तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवू शकता. हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम, उत्तम आहार, झोप, ध्यान-योगाचा आपल्या दिनक्रमात समावेश करा आणि तणाव-धूम्रपान-दारू यांपासून दूर राहा.
 


>> हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे


> अन्नातील प्रथिने वाढवा, कर्बोदके कमी करा. फळे खा. आहारातून मीठ, साखर, तांदूळ आणि मैद्याचे पदार्थ कमी करा, त्यांना वगळा.
> तणाव कमी करण्यासाठी प्रत्येक उपायावर काम करा.
> झोपण्याची एक वेळ आणि तास निश्चित ठेवा. कमी झोप घेणे टाळा.
> दररोज 25-30 मिनिटे कार्डिओ व्यायाम करा.
 


>> हृदयविकाराचा धोक्याचा इशारा


> अन्न खाल्ल्यानंतर पोटात आम्लपित्त होत असल्यास
> जास्त चालताना किंवा पायऱ्या चढताना श्वास लागणे
> जबड्यापासून कंबरेपर्यंत जडपणा जाणवणे
> पूर्वी सहज केले जाणारे काम करण्यात अडचण
> अचानक अस्वस्थता वाटणे
> हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास


(विशेष सूचना : ही बातमी माहितीसाठी आहे. आरोग्य विषयक समस्या, सल्ला आपल्या डॉक्टरांकडून घ्यावा.)