Anjeer Halwa Recipe : एकीकडे राज्यात थंडीचा (Winter) कडाका वाढतोय, तर दुसरीकडे घसरलेल्या पाऱ्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. हिवाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूत आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरतो, तो तुमचा आहार. योग्य आणि शरीराला ऊब देणाऱ्या पदार्थांचा हिवाळ्यात आहारात समावेश केल्यानं खूप फायदा होता. हिवाळ्यात आरोग्य उत्तम राखण्यास सर्वात फायदेशीर ठरतात ड्रायफ्रुट्स. आपल्या सर्वांनाच ड्रायफ्रुट्सच्या (Recipe Of Dry Fruits) आरोग्यदायी फायद्यांबाबत माहिती आहे. त्यातल्या त्यात ड्रायफ्रुट्समध्ये समाविष्ट ठरणारं अंजीर (Anjeer Halwa) तर हिवाळ्यात अत्यंत गुणकारी ठरतं.
अंजीरमध्ये मुळातच उष्ण गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्यात अंजीर खाल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात शरीराला ऊब देण्याचं काम अंजीर करतं. अंजिरमध्ये एंटीऑक्सीडेंट्स, फायबर, झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखे अनेक गुणधर्म असतात. अशातच आपल्यापैकी अनेकांना नुसते ड्रायफ्रुट्स खाणं आवडत नाही. अशावेळी तुम्ही या ड्रायफ्रुट्सच्या हटके रेसीपी करुन खाऊ शकता.
आज आम्ही तुम्हाला अशीच एक हटके आणि क्लासी रेसीपी सांगणार आहोत. खाण्यासाठी चविष्ट आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी अशी झटपट होणारी अंजीर हलव्याची रेसीपी (Recipe Of Anjeer Halwa) तुम्ही नक्की ट्राय करा...
साहित्य : (Ingredients for Fig Halwa)
- 200 ग्रॅम सुकं अंजीर
- तूप
- अर्धा कप बदामाचे काप (तुम्हाला आवडत असल्यास इतर ड्रायफ्रुट्सही घेऊ शकता)
- मिल्क पावडर
- 4 मोठे चमचे साखर
- वेलची पावडर
कृती : (Recipe of Fig Halwa)
- उकळत्या पाण्यामध्ये अंजीर टाकून 3 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्या.
- त्यानंतर पाण्यातून काढून त्याचे लहान लहान तुकडे करून घ्या.
- गॅसवर एक कढई ठेवा. त्यात तूप गरम करुन त्यात बदामाचे काप किंवा इतर ड्रायफ्रुट्सचे तुकडे मंद आचेवर परतून घ्या.
- बदामाचे तुकडे परतल्यानंतर त्यात अंजीरचे तुकडे, मिल्क पावडर, अर्धा कप पाणी आणि साखर एकत्र करा आणि परतून घ्या.
- तब्बल पाच मिनिटांपर्यंत सर्व मिश्रण एकजीव करा आणि व्यवस्थित परतून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- गरम गरम अंजिरचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.
(टिप : वर सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टी आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)