Zika Virus : बेंगळुरूच्या जवळ असलेल्या चिक्कबल्लापूर जिल्ह्यात डासांमध्ये प्राणघातक झिका व्हायरस (Zika Virus) आढळल्यानंतर कर्नाटक आरोग्य विभाग हाय अलर्टवर आहे. या संदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांच्या विशेष बैठकाही घेण्यात आल्या असून सुरुवातीच्या टप्प्यात या व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, डासांच्या शरीरात झिका व्हायरसची राज्यातील विविध अशा 68 ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. याच दरम्यान, झिका व्हायरस नेमका कशामुळे होतो? या आजाराची लक्षणं नेमकी कोणती? आणि या आजारापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


काय आहे झिका व्हायरस..


झिका व्हायरस हा डासांमुळे पसरणारा व्हायरस आहे ज्यामुळे मानवी शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. दिवसा सक्रिय असलेल्या संक्रमित एडिस डासांच्या चाव्याद्वारे हा प्रामुख्याने लोकांमध्ये पसरतो. युगांडातील झिका जंगलाच्या नावावरून या व्हायरसचे नाव देण्यात आले आहे. 


झिका व्हायरसची लक्षणे



  • ताप येणे 

  • अंगावर खाज सुटणे

  • डोकेदुखीचा त्रास 

  • सांधेदुखीचा त्रास 

  • डोळे लाल होणे

  • स्नायूंचं दुखणं


झिका व्हायरसची सुरुवातीची लक्षणं सौम्य असू शकतात. पण, शरीरात व्हायरसचे प्रमाण वाढले की, ही लक्षणे गंभीर होऊ शकतात. अनेकांना संसर्ग झाल्यानंतर आठवडाभरानंतर या आजाराचं निदान होतं. झिका व्हायरस एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो. एडिस डासांची पैदास पाण्यात होते. एडिस डास जेव्हा झिका व्हायरसने संक्रमित व्यक्तीला चावतो तेव्हा तो त्याच्या रक्ताद्वारे संक्रमित होतो. 


झिका व्हायरसपासून बचाव कसा कराल? 



  • घरात डास होऊ देऊ नका, घरातील स्वच्छतेची काळजी घ्या. मच्छरदानीचा वापर करा.

  • घरात आणि आसपासच्या परिसरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका.  

  • ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरला आहे. तेथून प्रवास करुन येणाऱ्या महिलांनी किमान 8 आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये. 

  • झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते.

  • या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे.

  • घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. 

  • तुम्हाला डायबिटीज, हायपरटेंशन, इम्यूनिटी डिसऑर्डरसारख्या समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • प्रवास करुन आल्यावर दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ज्यूस किंवा नारळ पाण्याचे सेवन करा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : हिवाळ्यात मधुमेहाची समस्या वाढू शकते; 'या' सुपरफूड्सने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करा