Health Tips : जरी अनेक पुरुषांना देखील थायरॉईडचा (Thyroid) त्रास होत असला तरी मात्र, स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात थायरॉईडचा त्रास दिसतो. हा आजार शरीरातील हार्मोनल असंतुलनामुळे होतो. आपल्या घशात एक थायरॉईड ग्रंथी असते, जी हार्मोन्स तयार करते. जेव्हा काही कारणास्तव या अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, तेव्हा हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे थायरॉईडचा त्रास होतो. जर तुम्हाला या आजाराने ग्रासले असेल तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बहुतेक लोक शरीरात होणार्या छोट्या-छोट्या बदलांकडे लक्ष देत नाहीत, परंतु ही समस्या गंभीर बनू शकते.
थायरॉईडचे दोन प्रकार आहेत. जेव्हा थायरॉईड संप्रेरक शरीरात जास्त प्रमाणात तयार होते तेव्हा 'हायपरथायरॉईडीझम' ची समस्या उद्भवते आणि जेव्हा हा हार्मोन कमी प्रमाणात तयार होतो तेव्हा व्यक्ती 'हायपोथायरॉईडीझम'ला बळी पडतात. थायरॉईडच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष दिल्यास, जीवनशैलीत बदल करून आणि काही उपचार करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
हायपरथायरॉईडीझममध्ये 'ही' लक्षणे दिसतात
जर एखाद्याला हायपरथायरॉईडीझमची समस्या असेल तर वजन कमी होणे, भूक वाढणे, स्नायू कमकुवत होणे, हृदयाचे ठोके वाढणे, सतत चिंता होणे, चिडचिड होणे आणि जास्त घाम येणे अशी लक्षणे दिसू लागतात.
हायपोथायरॉईडीझमची लक्षणे कोणती?
जेव्हा एखाद्याला हायपोथायरॉईडीझमचा त्रास होतो तेव्हा त्याला कमी घाम येणे, जास्त केस गळणे, थकवा, चेहऱ्यावर सूज येणे, बद्धकोष्ठता, तणाव जाणवणे, हृदयाचे ठोके कमी वाटणे, स्नायू कडक होणे, सांधे दुखणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते.
'या' गोष्टी टाळा
जर तुम्हाला थायरॉईडची लक्षणे जाणवत असतील तर सोयाबीन आणि त्याच्या उत्पादनांचे सेवन करू नका. कारण सोयाबीनमध्ये फायटोस्ट्रोजेन आढळते. ज्यामुळे थायरॉईड संप्रेरक तयार करणार्या एन्झाइमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने अल्कोहोल, कॅफिनयुक्त चहा-कॉफी, अति मिठाई आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत.
जीवनशैलीत 'हे' बदल करा
निरोगी राहण्यासाठी, व्यायामासाठी दररोज थोडा वेळ काढणे खूप महत्वाचे आहे. थायरॉईडमध्ये सुद्धा दररोज व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहील. तसेच, कडधान्य, दुधी, परवळ, मशरूम या भाज्यांचा आहारात समावेश करा. याशिवाय गाईचे दूध, नारळ पाणी, ग्रीन टी, बदाम, शेंगदाणे यांसारखे पदार्थही फायदेशीर ठरू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :