Heart Attack In Women : बिघडती लाईफस्टाईल आणि इतर कारणांमुळे आजकाल हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. नुकतंच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचंदेखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 2022 मध्ये देखील अनेक बॉलिवूड कलाकारांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. हृदयविकाराचा झटका ही गंभीर समस्या बनत चालली आहे. इतर आजारांप्रमाणेच हृदयविकाराची लक्षणेही दिसून येतात. आपण फक्त त्यांना ओळखणं गरजेचं आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की पुरुष आणि स्त्रियांमध्येही हृदयविकाराची लक्षणे वेगळी असतात. त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिल्यास गंभीर समस्या टाळता येते. पण, दुर्लक्ष केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळे आज या ठिकाणी आपण महिलांमध्ये अशी कोणती हृदयविकाराची लक्षणे आहेत ती जाणून घेऊयात.
अनेक स्त्रियांना छातीत दुखत नाही
हृदयात दुखणं हे पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. पण हे जाणून आश्चर्य वाटेल की अनेक महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत दुखत नाही. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की महिलांना पाठ, मान आणि जबडा दुखण्याचा धोका जास्त असतो.
'ही' इतर लक्षणे स्त्रियांमध्ये दिसू शकतात
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, महिलांना मळमळ, उलट्या, जबडा, मान किंवा पाठीच्या वरच्या भागात वेदना, छाती किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना, धाप लागणे, अपचन आणि थकवा जाणवू शकतो. याशिवाय झोपेची समस्या, चिंता, चक्कर येणे, अॅसिडीटी ही लक्षणे दिसू शकतात.
50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना जास्त धोका असतो
रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये हृदयाच्या समस्या निर्माण होतात. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका जास्त असतो. शरीराचे वाढते वजन, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे यांसारख्या समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटकाही येतो
पुरुष असो किंवा स्त्रिया, हृदयविकार टाळण्यासाठी याला कोणती कारणे जबाबदार आहेत? हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. उच्च रक्तदाब, सामान्यपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल, मधुमेह, धूम्रपान, व्यायाम न करणे, किडनीचे आजार यामुळेही हृदयविकाराचा झटका येतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Health Tips : पोटाची चरबीही कमी होईल आणि पचनक्रियाही नीट राहील; सकाळी उठल्याबरोबर ही 3 आसनं करा