Diabetes Effective Management Tips : दरवर्षी 'फादर्स डे' 19 जून रोजी साजरा केला जातो. आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम, आदर आणि शिकवण तसेच त्यागाची आठवण करून देणारा असा हा दिवस. 'फादर्स डे' हा आपल्या जीवनातील वडिलांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आजकाल आपण पाहतो की महिलांपेक्षा पुरुषांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त आहे. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. तसेच या आजाराचे लाईफटाईम व्यवस्थापन करणे फार गरजेचे असते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन (National Library of Medicine) संशोधनानुसार महिलांच्‍या (1.4 टक्‍के) तुलनेत पुरूषांमध्‍ये (2.3 टक्‍के) मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. नुकत्याच एका संशोधनात असे निदर्शनास आले आहे की, 2025 पर्यंत जवळपास एक-तृतीयांश भारतीयांना मधुमेह होण्‍याचा अंदाज आहे. मधुमेह होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत जसे की, अनुवांशिक, पर्यावरणीय स्थिती, जीवनशैली पद्धती, खाण्‍याच्‍या सवयी आणि लठ्ठपणा इ. आपले वय वाढत जाते तसे शरीराची रचना आणि इन्‍सुलिन प्रतिकारशक्‍ती बदलत जाते, परिणामत: शारीरिक कार्यांचे नियमन कमी होत जाते आणि लठ्ठपणा तसेच मधुमेह होऊ शकतो. आज कित्येक वडील असे आहेत की जे मधुमेहासह जगत आहेत.


या संदर्भात बेंगळुरूमधील हॉसमॅट हॉस्पिटल्‍सच्‍या इंटर्नल मेडिसीन, डायबेटोलॉजी आणि नॉन-इन्‍वेसिव्‍ह कार्डियोलॉजीचे सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. सुनिल बोहरा (Dr. Sunil Bohra) म्‍हणाले की, ''टाइप 2 मधुमेहाचे व्‍यवस्‍थापन म्‍हणजे जीवनशैली बदल करणे, औषधोपचार घेणे आणि रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणाची तपासणी करणे, या सर्व गोष्‍टींसाठी योग्‍य नियोजनाची गरज असते. तंत्रज्ञान मधुमेह व्‍यवस्‍थापनामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात, ते उत्तमपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये मदत करतात. म्‍हणूनच सर्वोत्तम ठरू शकते असे नियोजन करणे महत्त्वाचे आहे, मग ते त्‍यांचे औषधोपचाराचे वेळापत्रक निर्धारित करायचे असो वा त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन्‍समध्‍ये रिमांइडर्स लावायचा असो.''


वडिलांचा मधुमेहापासून काळजी घेण्यासाठी काही सोपे उपाय :     


1. नियमित व्यायाम करा : संशोधनामधून असे निदर्शनास आले आहे की, बहुतेकदा मधुमेही व्यक्ती लठ्ठ असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा झटका, स्‍ट्रोक किंवा मूत्रपिंड आजार असे एथेरोस्क्लेरोसिस-संबंधित आजारांचा धोका वाढण्‍याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी काही शारीरिक हालचाली जसे की, पोहणे, सायकल चालवणे, ऐरोबिक्‍स करणे गरजेचे आहे. 


2. रिफाइन्‍ड साखर टाळा : मद्य पेये, शीतपेये, ज्‍यूस, मिठाई, कँडी यामध्‍ये असलेली साखर उच्‍च रिफाइन्‍ड केलेली असते आणि त्‍यामुळे शरीरातील शर्करेच्‍या प्रमाणामध्‍ये वाढ होते. गोड पदार्थ आवडणा-या व्‍यक्‍तींना अशी उत्‍पादने टाळून त्‍याऐवजी नैसर्गिक साखरेचे सेवन करण्‍याचा सल्‍ला दिला जातो.


3. नियमितपणे रक्‍तातील शर्करेच्‍या प्रमाणावर देखरेख ठेवा : मधुमेहाच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ग्‍लुकोजची वेळोवेळी चाचणी करणे महत्त्वाचे आहे. व्‍यस्‍त जीवनशैलींसह शर्करा पातळ्यांची तपासणी करणे अवघड बनले आहे. शर्करा पातळ्यांवर देखरेख ठेवल्‍याने अनुकूल आहार योजना, व्‍यायाम नित्‍यक्रम आणि आरोग्‍यदायी जीवनशैली राखण्‍यास मदत होते.  


4. तणावाचे व्‍यवस्‍थापन करा : योगा तसेच चिंतन केल्याने मनाला शांती मिळते तसेच तणाव कमी होतो. त्यामुळे नियमित योगा करा.    


5. टस्‍टोस्‍टेरोन पातळ्यांमध्‍ये वाढ करा : संशोधनामधून निदर्शनास येते की, पुरूषाच्‍या शरीरामध्‍ये टेस्‍टोस्‍टेरोन पातळ्यांमधील असंतुलामुळे मधुमेह होऊ शकतो. हार्मोन्‍सची योग्‍य पातळी राखल्याने मधुमेहाचा धोका कमी होण्‍यास मदत होऊ शकते. जीवनसत्‍व ड आणि झिंक असलेले खाद्यपदार्थ टेस्‍टोस्‍टेरोन पातळ्या आणि पुरूषांची प्रजननक्षमता वाढवण्‍यास मदत करतात.


6. धूम्रपान सोडा : तंबाखू आणि सिगारेटच्‍या धूरामधील टॉक्झिन्‍समुळे त्याचा परिणाम मधुमेहावर होऊ शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्‍ट्रोक किंवा मूत्रपिंड आजारामुळे मधुमेह असलेल्‍या व्‍यक्‍तींचा लवकर मृत्‍यू होण्‍याचा धोका वाढू शकतो.       


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :