Health News : उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक आणि परिधीय धमनी रोग (Peripheral Artery Disease) होऊ शकतात कारण रक्तवाहिन्यांमध्ये साचलेल्या चरबीमुळे रक्तवाहिन्यांमधून पुरेसे रक्त वाहून अवघड होते. लठ्ठपणा, धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव, फायबरयुक्त पदार्थांचे कमी सेवन आणि चुकीचा चरबीयुक्त आहार यामुळे कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी वाढू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोलेस्टेरॉलची योग्य पातळी राखणे आवश्यक आहे. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी खालील टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरु शकतात.
· नियमित व्यायाम करणे : दररोज व्यायाम केल्याने तुमची कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. व्यायाम उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL) कोलेस्ट्रॉल, चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत करतो. तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही क्रिया करु शकता जसे की पोहणे, योगा करणे, धावणे, पिलेट्स, वेट ट्रेनिंग किंवा आठवड्यातून 5 दिवस किमान 30 मिनिटे जॉगिंग करावी.
· धूम्रपान टाळा : धूम्रपान केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी एलडीएल वाढू शकते हे देखील एक ज्ञात सत्य आहे. शिवाय, धूम्रपान सोडल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. डॉक्टरांच्या मदतीने धूम्रपान बंद करण्याच्या थेरपीची निवड करणे चांगले आहे.
· वजन नियंत्रणात ठेवा : जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे कोलेस्टेरॉलची पातळी असामान्य होऊ शकते. ताजी फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, मसूर, तेलबिया आणि काजू यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या. तर जंक फूड, मसालेदार, तेलकट, कॅन केलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा. लिंबूवर्गीय पदार्थ खा जो एलडीएल कमी करतो. ओमेगा-3 फॅटी अॅसिड्सने समृद्ध अन्नपदार्थांचे सेवन करा. ओमेगा-3 रक्तप्रवाहात ट्रायग्लिसराइड्स कमी करतात आणि हृदयाची असामान्य लय सुरु होण्यापासून रोखण्यासाठी मदत करुन हृदयाचे रक्षण करतात. कार्बोनेट्ड पेय, बेकरी पदार्थ, मिष्टान्न, मिठाई आणि नमकीन यांचे सेवन टाळा. तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश करा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
· अल्कोहोलचे सेवन टाळा : मद्यपानामुळे उच्च रक्तदाब, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोक यासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
तुम्हाला तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवावी लागेल तसेच वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. शिवाय, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सुचवलेली औषधे वगळू नका.
- डॉ निकेश जैन, हृदयरोगतज्ज्ञ, एसआरव्ही हॉस्पिटल चेंबूर
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.