Constipation in Pregnancy : गर्भवती महिलांमध्ये (Pregnant Women) सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता (Constipation). 16 ते 39 टक्के गर्भवती महिलांना गर्भावस्थेत बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. प्रसुतीनंतर (Delivery) काही स्त्रियांना आतडे तसेच जठरासंबंधित समस्या उद्भवू शकतात. या समस्या यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड आणि पाचन तंत्राव्यतिरिक्त इतर पाचक अवयवांवरही विपरीत परिणाम करु शकतात यामध्ये अन्ननलिका, पोट, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदाशयाचा समावेश होतो. काही स्त्रियांना आधीच गर्भधारणेपूर्वीच पोटासंबंधी तक्रारी असतात ज्या गर्भवस्थेत आणखीच वाढू शकतात. 


तिसऱ्या तिमाहीत (Third Trimester) बद्धकोष्ठता होण्याची शक्यता अधिक असते. कारण या काळात होणाऱ्या गर्भाच्या विकासामुळे आतड्यावर सर्वाधिक ताण पडू शकतो. बद्धकोष्ठता ही कोणत्याही तिमाहीत होऊ शकते. बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला तीन महिन्यांपर्यंत बद्धकोष्ठता जाणवू शकते. पहिल्या तिमाहीत प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण जास्त असणे, मळमळ आणि उलट्यामुळे द्रवपदार्थाचे तसेच अन्नाचे पुरेसे सेवन न केल्यानेही पोटासंबंधीत तक्रारी उद्भवतात.


गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत गर्भाचा विकास होत असून अनेक महत्त्वाचे बदल होतात. यावेळी पोटातील गर्भाच्या हालचाली जाणवतात. तुमचे बाळ वाढत असताना तुमचे शरीर झपाट्याने बदलत असते. बद्धकोष्ठता, गॅस आणि छातीत जळजळ यासह पचनाशी संबंधित समस्या डोके वर काढू शकतात.


बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊ.


• दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
• हळूहळू तुमच्या आहारातील फायबरचे प्रमाण वाढवा. तुमचे रोजचे 28 ग्रॅम फायबरचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यानुसार आहाराचे सेवन करा.
• सोयाबीनचा आहारात समावेश करा.
• फायबरयुक्त भाज्या जसे की बटाटे, रताळे, ब्रोकोली आणि गाजर यांचे सेवन करा.
• नासपती, अंजीर, स्ट्रॉबेरी, सफरचंद, केळी आणि संत्री या फळांचे सेवन करा.
• ब्राऊन राईस, पास्ता आणि ब्रेड यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा.
• तृणधान्ये आणि दलिया (कोंड्यासहित) यांचाही आहारात समावेश करा.
• तुमची पाचक प्रणाली सक्रिय करण्यासाठी आणि सामान्य आतड्याच्या हालचालींना प्रोत्साहन देण्यासाठी, दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.


बद्धकोष्ठता होण्याची कारणे


गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या होर्मोन्सचा चढ-उतार जठर तसेच आतड्यांच्या कार्यावर परिणाम करते. पचनक्रिया मंदावल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्या उद्भवतात. काही प्रसुतीपूर्व जीवनसत्त्वाचे सेवन केल्याने आणि आयर्न सप्लिमेंट्स घेतल्यानेही बद्धकोष्ठता होऊ शकते. गर्भावस्थेच्या नंतरच्या काळात वाढणाऱ्या गर्भाशयाच्या दबावामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मल बाहेर पडणे अधिक कठीण होते.


द्रवपदार्थ आणि फायबरयुक्त आहारचं सेवन करा


आहारातील द्रवपदार्थाचे सेवन वाढवून आणि फायबरयुक्त आहाराचे सेवन करुन बद्धकोष्ठता कमी केली जाऊ शकते. काही सुरक्षित आयर्न सप्लिमेंट्समध्ये स्टूल सॉफ्टनर्स देखील असतात. पोटात अस्वस्थता, मलावाटे रक्त येणे किंवा मूळव्याधाचा त्रास असल्यास पुढील उपचारांबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संवाद साधा.


- डॉ. अनु विज, सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.