Mother's Day 2024 Health : स्वत:चं दुखणं लपवत मुलांच्या चेहऱ्यावर हासू आणणारी ती म्हणजे आई... आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही... हो की नाही? आईचे थोर उपकार आहे, तिला धन्यवाद म्हणण्यासाठी मातृदिन हा एकच दिवस पुरेसा नाही.. खरं सांगायचं तर संपूर्ण आयुष्य कमी पडेल. पण तरीही, या दिवशी आईला स्पेशल वाटण्यासाठी, मदर्स डेनिमित्त काही खास प्रयत्न केले पाहिजेत. मदर्स डे अगदी जवळ आला आहे. या मातृदिनानिमित्त आईला भेटवस्तू देणे, तिच्यासोबत वेळ घालवणे किंवा तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे याशिवाय तुम्ही तिच्यासाठी काहीतरी खास करायला हवे. यंदा तुमच्या आईला निरोगी आरोग्याची भेट दिली तर कसं राहील? जाणून घ्या...


 


महिला आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात.


यंदा जागतिक मातृदिन 12 मे रोजी आहे. या दिवशी आईला खूश ठेवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आरोग्याची काळजी घेणंही गरजेचं आहे. महिला आणि विशेषतः माता त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. याशिवाय अनेक आजारांचा धोका कायम आहे. म्हणूनच, या मदर्स डे, आपल्या आईला आरोग्याची भेट द्या आणि काही महत्त्वाच्या चाचण्या करा. जेणेकरून ती दीर्घकाळ निरोगी राहील. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीनुसार नोएडा येथील न्यूबर्ग डायग्नोस्टिकचे प्रमुख डॉ.विज्ञान मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली ​​आहे.


 


महिलांनी काही आरोग्य चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.


बोन डेंसिटी चाचणी


वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होतात आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका असतो. बोन डेंसिटी चाचणी ही हाडांचे आरोग्य आणि फ्रॅक्चरचा धोका समजून घेणे सोपे करते. हाडांच्या कमकुवततेची संपूर्ण माहिती वेळेत मिळाल्यास योग्य उपचार करता येतात.


नियमित रक्तदाब तपासणी


वाढत्या वयानुसार उच्च रक्तदाबाची समस्या वाढत जाते. यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. नियमितपणे बीपीचे निरीक्षण करणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण टाळता येईल.


कोलेस्टेरॉल पातळी


कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका असतो. चांगले कोलेस्टेरॉल (HDL) आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) तपासणे खूप महत्वाचे आहे. जर कोलेस्टेरॉलची पातळी योग्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध द्यावे.


रक्त ग्लुकोज चाचणी


वयानुसार मधुमेहाचा धोकाही वाढतो. मधुमेहाचे प्रमाण वाढले की मूत्रपिंडाचे आजार, मज्जातंतूंचे नुकसान आणि डोळ्यांच्या समस्या उद्भवू शकतात. HbA1c चाचणी गेल्या काही महिन्यांतील रक्तातील ग्लुकोजच्या पातळीबद्दल अचूक माहिती देते.


मॅमोग्राम


वाढत्या वयानुसार महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे वेळोवेळी मॅमोग्राम करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्तनाच्या ऊतींमध्ये होणारा कोणताही बदल वेळेत लक्षात येईल आणि येणारा धोका टाळता येईल.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणतीही चाचणी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या )


हेही वाचा>>>


Health : हीच ती वेळ..! 1 महिना मद्यपान सोडल्याने शरीरात होतात आश्चर्यकारक बदल, फायदे जाणून व्हाल थक्क