Health : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. कारण कामाचा ताण, वाढते प्रदुषण आणि खाण्याच्या अयोग्य वेळा या सर्व गोष्टींमुळे माणसाच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. अशातच आजकाल, त्वचेवर अकाली सुरकुत्या येणे ही एक सामान्य समस्या बनलीय. वेळे आधीच त्वचेवर वृद्धत्वाचे लक्षण दिसणे ही एक धोक्याची घंटा आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा त्वचेचे वृद्धत्व टाळण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत. ते जाणून घेऊया..


 


बदलत्या जीवनशैलीचा परिणाम


चांगल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या त्वचेसाठी योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव आणि कामामुळे आजकाल लोकांनी खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीचा अवलंब केला आहे. या वाईट सवयींचा शरीराच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो आणि ते त्वचेद्वारे आपल्याला दिसून येतात. असे बरेच लोक आहेत ज्यांना अकाली सुरकुत्या येऊ लागतात, तसेच त्यांना वृद्धत्वासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. ही समस्या टाळण्याचे अनेक मार्ग आहेत. जाणून घेऊया..


 


चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा वृद्धत्व टाळण्यासाठी..


पुरुष असो वा महिला, आजकाल अनेकजण अकाली वृद्धत्वासारख्या समस्यांशी झुंजत आहे. योग्य आहारामुळे त्वचेचे वृद्धत्व आणि सुरकुत्या दूर होण्यास खूप मदत होते. काही पदार्थ त्वचेचे आरोग्य राखतात, ज्याला अँटी एजिंग फूड्स म्हणतात, हे पदार्थ ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात, जे त्वचा वृद्धत्वाचे एक मुख्य कारण आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या किंवा त्वचेचे वृद्धत्व टाळण्यासाठी अनेक जण कॉस्मेटिक उत्पादनं जसे की लोशन, क्रीम, मास्क आणि सीरम इत्यादी वापरतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकजण डॉक्टरांकडेही जातात. त्यामुळेच खूप उशीर होण्याआधी, तसेच तुम्हालाही या समस्यांना सामोरे जावे लागण्याआधी, ते टाळण्याचे उपाय जाणून घेऊया. तुमच्या आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करून तुम्ही ही समस्या टाळू शकता. त्वचेचे आरोग्य सुधारू शकणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी जाणून घ्या..


 


फळे आणि भाज्या


फळे आणि भाज्यांमध्ये अमीनो ॲसिड, अँटिऑक्सिडंट आणि जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. विशेषतः ब्रोकोली, पालक, टोमॅटो आणि आवळा यांसारखी चमकदार रंगाची फळे आणि भाज्या त्वचेचे वृद्धत्व टाळण्यासाठी उपयुक्त मानल्या जातात.


 


तुमच्या आहारात प्रथिनांचा समावेश करा


मांस, मासे, कडधान्ये आणि धान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, जे त्वचेसाठी आवश्यक असते. प्रथिने त्वचेची रासायनिक रचना राखण्यास मदत करतात. तसेच त्वचा मजबूत आणि चमकदार बनते.


 


अमीनो ऍसिडने भरपूर आहार घ्या


अमीनो ऍसिड त्वचेच्या कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यासाठी दुग्धजन्य पदार्थ, अंडी, सोया, पालक अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करता येईल, ज्यामध्ये अमिनो ॲसिड मुबलक प्रमाणात असते.


 


आरोग्यदायी तेल


ऑलिव्ह, नारळ आणि एवोकॅडो यासारखे आरोग्यदायी तेल त्वचेसाठी महत्त्वाचे आहेत. हे तेल त्वचेला चरबी जमा होण्यापासून आणि कोरडेपणापासून वाचवतात आणि ते निरोगी ठेवण्यास मदत करतात. तुमच्या आहारात या तेलांचा समावेश करण्याव्यतिरिक्त, तुम्ही ते थेट तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता आणि तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करू शकता.



हेल्दी पेय प्या


आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी, योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे. पाणी, हर्बल चहा, नारळ पाणी आणि दुधीचा रस यांसारखी आरोग्यदायी पेये त्वचेला हायड्रेट आणि निरोगी ठेवतात.


 


 


हेही वाचा>>>


Health : भर उन्हातून घरी आल्यावर तुम्हीही फ्रीजमधील थंड पाणी पिता? तर सावधान! आरोग्याला होणारे नुकसान जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )