Health : आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण, खाण्याच्या अयोग्य वेळा, व्यायामाचा अभाव, आणि इतर गोष्टींमुळे लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय. तसेच अनेक लोकांना लठ्ठपणा झाला आहे. सध्या प्रौढ लोकांसह तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण दिसून येत आहे. हृदयविकाराचा झटका हे मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक मानले जाते. एका अहवालात कोरोना महामारीनंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये आणखी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांमुळे भारतात मोठ्या संख्येने लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य कारण रक्तदाब, लठ्ठपणा मानले जात असे, मात्र तुम्हाला माहित आहे का? या व्यतिरिक्त इतरही अनेक कारणं आहेत, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु प्रत्यक्षात त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.


 


अशा लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक असतो...


हृदयविकार सारख्या जीवघेण्या स्थितीसाठी वाढलेला रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल हे प्रमुख जोखीम घटक मानले जातात. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आधीच हृदयविकार आहे किंवा जे लठ्ठ आहेत तसेच दिवसभर बसून वेळ घालवतात अशा लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सर्वांनी हृदयाच्या आरोग्याबाबत सतत सतर्क राहणे गरजेचे आहे. हृदयरोग तज्ज्ञ म्हणतात, लठ्ठपणा आणि रक्तदाब हे हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात हानिकारक मानले जाते. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होण्याचा धोका असतो. वाढलेले कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आणि अयोग्य आहारामुळेही हृदयविकाराचा धोका वाढतो. या सर्वांव्यतिरिक्त, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वाईट सवयी आहेत, ज्यामुळे हृदयाला खूप हानी पोहोचते. लोकांना याबद्दल माहिती असणे देखील खूप महत्वाचे आहे.


 


झोपेचा अभाव धोकादायक


संपूर्ण आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारते. तुम्हाला नियमित पुरेशी झोप न मिळाल्यास तुम्हाला चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो. या वारंवार झोपेच्या समस्येमुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. एका अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की जे लोक सहसा रात्री 6 तासांपेक्षा कमी झोपतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 6 ते 8 तास अखंड झोपलेल्या लोकांपेक्षा दुप्पट असते. असे मानले जाते की, झोपेच्या कमतरतेमुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो आणि जळजळ होण्याचा धोका वाढू शकतो. हृदयविकाराच्या झटक्यासाठी हे दोन्ही प्रमुख जोखीम घटक आहेत.


 


वायू प्रदूषणामुळे..


वायुप्रदूषण हे श्वासोच्छवासाच्या आरोग्यासाठी आणि फुफ्फुसांसाठी हानिकारक मानले जाते, परंतु प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो हे तुम्हाला माहीत आहे का? संशोधकांनी सांगितले की, जे लोक नियमितपणे प्रदूषित हवेचा श्वास घेतात. त्यांना रक्तवाहिन्यांचा आजार आणि हृदयरोग होण्याची शक्यता असते. एका अहवालात, वायुप्रदूषण हे एथेरोस्क्लेरोसिससाठी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. ज्यामुळे धमनीच्या भिंतींमध्ये प्लेक तयार होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा त्रास होतो. प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.


 


अचानक किंवा तीव्र व्यायाम हानिकारक


तंदुरुस्त राहणे आणि नियमित व्यायाम केल्याने तुमचे हृदय निरोगी राहते, परंतु जास्त व्यायाम करणे देखील धोकादायक ठरू शकते. सुमारे 6% हृदयविकाराचा झटका जास्त शारीरिक व्यायामामुळे येतो. क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलल्यामुळे किंवा दीर्घ शारीरिक हालचालींमुळे हृदयावर दाब वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब झपाट्याने वाढण्याचा धोका असतो. अलिकडच्या वर्षांत, जिममध्ये हृदयविकाराच्या अनेक प्रकरणांची नोंद झाली आहे.


 


 


हेही वाचा>>>


Health : पचन समस्येचा थेट मानसिक तणावाशी संबंध? ही लक्षणं तुम्हाला नाही ना? गांभीर्याने लक्ष देण्याची गरज


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.