Health : सध्या डेंग्यूच्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशात व्हायरल ताप कोणता आणि डेंग्यूचा ताप कोणता हे ओळखणे कठीण झाले आहे. डेंग्यू ताप आणि विषाणूजन्य तापाची सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात. डेंग्यूची लक्षणे वेळीच ओळखली नाहीत तर रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे डेंग्यू तापाची लक्षणं वेळीच ओळखणे गरजेचे आहे. बऱ्याचदा लोक त्याची सुरुवातीच्या लक्षणांना व्हायरल तापाची लक्षणे समजतात. डेंग्यूची लक्षणे सामान्य तापापेक्षा वेगळी कशी असतात? हे आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. 


 


डेंग्यू ताप आणि विषाणूजन्य तापाची सुरुवातीची लक्षणे सारखीच


राष्ट्रीय डेंग्यू दिन दरवर्षी 16 मे रोजी असतो. डेंग्यूबद्दल जनजागृती करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. दरवर्षी पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून येतात. डेंग्यू ताप आणि विषाणूजन्य तापाची सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात. पण, सुरुवातीला दोघांमध्ये फरक करणे कठीण होते. मादी एडिस डास चावल्याने डेंग्यू होतो. त्यामुळे पावसाळ्यात डासांपासून स्वतःचा बचाव करणे खूप गरजेचे आहे. हर जिंदगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार नवी दिल्ली येथील डॉ. प्रशांत सिन्हा, यांनी याबाबत माहिती दिली आहे.


 


डेंग्यू ताप आणि विषाणूजन्य तापाच्या लक्षणांमध्ये फरक


विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू या दोन्हींमध्ये माणसाला ताप येतो. हा ताप व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार कमी-अधिक असू शकतो.
डेंग्यू तापामध्ये, एखाद्या व्यक्तीला तीव्र डोकेदुखी आणि रेट्रो-ऑर्बिटल वेदना म्हणजेच डोळ्यांच्या मागे वेदना होतात.
डेंग्यू तापाला ब्रेकबोन फिव्हर असेही म्हणतात. यामध्ये व्यक्तीच्या स्नायू आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.
ही दोन्ही लक्षणे सामान्य तापात फारशी दिसत नाहीत. त्यांच्या मदतीने तुम्ही सामान्य ताप आणि डेंग्यू ताप यांच्यात फरक करू शकता.
काही खाल्ल्यानंतर भूक न लागणे किंवा उलट्या होणे हे देखील एक लक्षण आहे, जर दिसले तर तुम्ही ताबडतोब सावध व्हावे.
डेंग्यूमध्ये अनेक लोकांच्या छातीवर, पाठीवर किंवा शरीराच्या इतर भागांवर लाल रंगाचे ठसे उमटतात.
कधीकधी नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
ही सर्व लक्षणे सूचित करतात की कदाचित तुम्ही डेंग्यूचा बळी झाला आहात. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर लवकरात लवकर योग्य उपचार सुरू केले पाहिजेत.


डेंग्यूची लक्षणे ओळखल्यानंतर या गोष्टी करा


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला डेंग्यूची लक्षणे जाणवत असतील तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. इंटरनेटवर किंवा इतरत्र उपलब्ध असलेली औषधे किंवा इतर काही वापरून पाहू नका. या काळात जास्तीत जास्त पाणी प्या. डेंग्यूचा ताप वेळेवर ओळखणे महत्त्वाचे आहे जेणेकरून रुग्णाला योग्य उपचार मिळू शकतील.


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो टेन्शन कमी घ्या.. सतत तणावाखाली राहिल्यास पोट वाढते, कसे कमी कराल? जाणून घ्या


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )