Health : उन्हाळा आला की सर्वात जास्त पाण्याची गरज आपल्याला असते. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून लोक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पितात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे. मात्र अनेकांच्या मनात संभ्रम असतो की रोज किती पाणी प्यावे? सामान्य शरीरासाठी, आपल्याला दररोज किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे हे आपण सूत्राच्या मदतीने जाणून घेऊया..


 


डिहायड्रेशनमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात


आपल्या सर्वांना माहित आहे की, आपले शरीर 75% पाण्याने बनलेले आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या दैनंदिन कामासाठी पाण्याची गरज असते. आपण अनेकदा ऐकलंय आपल्याला निरोगी राहायचे असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे. जास्त पाणी पिल्याने आपण अनेक आरोग्य समस्यांपासून दूर राहतो. पाण्याची पातळी शरीराचे तापमान सामान्य ठेवते, शरीराला डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून वाचवते. म्हणूनच आपल्याला दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण डिहायड्रेशनमुळे म्हणजेच शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्हाला अशक्तपणा, बद्धकोष्ठता आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.


प्रत्येकासाठी पाण्याचे प्रमाण वेगळे 


तुम्हाला हे माहित आहे का? प्रत्येकासाठी पाण्याचे प्रमाण एकमेकांपेक्षा वेगळे आहे. पाण्याची गरज व्यक्तीच्या वातावरणावर, त्याचे काम आणि इतर अनेक परिस्थितींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती थंड वातावरणात राहते, तर त्याला उन्हाळ्यात राहणाऱ्या लोकांपेक्षा कमी पाण्याची गरज भासेल. त्याचप्रमाणे एसी रूममध्ये बसून काम करणाऱ्या लोकांनाही उन्हात कष्ट करणाऱ्यांपेक्षा कमी पाणी लागते. त्याचप्रमाणे ज्या लोकांना जास्त घाम येतो आणि लघवी होते त्यांनी जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पण माणसाने शक्य तितके पाणी प्यावे असे आपण म्हणत असताना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. जेव्हा आपण शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पितो आणि त्या प्रमाणात शरीर शरीरातून पाणी बाहेर काढू शकत नाही, तेव्हा शरीरात ओव्हरहायड्रेशनची समस्या उद्भवते. यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते.


पाणी पिण्याचे योग्य सूत्र काय आहे?


सामान्य शरीरासाठी, आपल्याला दररोज किती लिटर पाण्याची आवश्यकता आहे हे आपण सूत्राच्या मदतीने जाणून घेऊया. यासाठी तुमच्या शरीराचे वजन 0.03 ने गुणाकार करा. आपल्याला उत्तर म्हणून तितके लिटर पाणी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर तुमचे वजन 70 किलो असेल आणि तुम्ही ते 0.03 ने गुणले तर उत्तर 2.1 असेल म्हणजेच 2100 मिली पाणी पिणे तुमच्यासाठी योग्य असेल. तसं पाहायला गेलं तर, पाणी पिण्याचे कोणतेही निश्चित प्रमाण नाही. साधारणपणे दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो, हे पाणी निरोगी व्यक्तीसाठी पुरेसे मानले जाते. परंतु पाण्याचे प्रमाण हे वातावरण, व्यायाम, आहार, एकूण आरोग्य, एसीमध्ये बसणे किंवा बाहेर उन्हात काम करणे आणि आरोग्याच्या विविध परिस्थितींवर अवलंबून असते. तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्या आणि दैनंदिन दिनचर्याबद्दल तज्ञांशी बोलू शकता आणि या विषयावर सल्ला घेऊ शकता.


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health : सकाळी उठल्या उठल्या तुम्हीही पाणी पिता? आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? तज्ज्ञ काय सांगतात...


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )