Health : पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी होते. अशात जर जंकफूडचे अतिसेवन, खाण्याच्या अयोग्य वेळा, ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार होतात. पावसाळ्यात जीवजंतू आणि इतर विषाणूंसाठी पोषक वातावरण असल्याने अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पावसाळ्यात जर मजबूत प्रतिकारशक्ती हवी, तर जेवणाच्या ताटात काही गोष्टी आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात आणि दिनचर्येत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे.


 


आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक


तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, तुमची प्रतिकारशक्ती मजबूत राहणे सर्वात महत्वाचे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? शरीराची प्रतिकारशक्ती कशी मजबूत करता येते? आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आणि दिनचर्येत आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. सर्व वयोगटातील लोकांनी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पण यासाठी सप्लिमेंट्स घेण्याऐवजी पौष्टिक अन्नाला आपल्या ताटाचा भाग बनवा. ताटात काही गोष्टींचा समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञ कोणत्या गोष्टी सांगतात?


 


एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध मसाले


हळद, लवंग, काळी मिरी, दालचिनी इत्यादी भारतीय मसाले हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे मसाले आहेत. हे तुमचे शरीर शुद्ध करतात आणि तुमच्या शरीराची संरक्षण यंत्रणा वाढवतात. हळदीमध्ये आढळणाऱ्या कर्क्युमिनचा शरीरावर एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रभाव असतो. कर्क्युमिनला रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे मानले जाते आणि ते अँटीव्हायरल म्हणून देखील कार्य करते.


 


दुग्धजन्य पदार्थांचे सेवन आवश्यक


आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. दही, दूध, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. दही हे प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्रोत मानला जातो जे आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या बॅक्टेरियांना योग्य पचन राखण्यासाठी प्रोत्साहन देतात. सर्व लोकांनी याचे नियमित सेवन करावे.


 


दररोज दोन आंबट फळे खा


जवळजवळ सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्रा, लिंबू, अननस यांसारख्या फळांचे सेवन शरीराला हे आवश्यक जीवनसत्व सहज पुरवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी सर्वात आवश्यक आणि फायदेशीर मानले जाते. हे पांढऱ्या रक्त पेशींचे उत्पादन वाढवण्यास उपयुक्त आहे, जे तुम्हाला संक्रमणाशी लढण्यास मदत करते.


 


हिरव्या पालेभाज्यांचे फायदे


पालक आणि ब्रोकोलीसारख्या भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन ए, सी, ई), खनिजे आणि फायबर भरपूर असतात. हे पोषक घटक आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवतात. शरीराला आवश्यक असलेली बहुतांश पोषकतत्त्वे हिरव्या भाज्या खाल्ल्याने सहज मिळू शकतात. संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक जास्त हिरव्या भाज्या खातात त्यांना आजारी पडण्याचा धोका कमी असतो.


 


हेही वाचा>>>


काय सांगता..! आता धूम्रपान न करणाऱ्यांनाही Lung Cancer चा धोका? कसा होतो हा कर्करोग? एका अभ्यासातून खुलासा


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )