Women Health: आईच्या आयुष्यातला स्तनपान हा महत्त्वाचा टप्पा असतो. स्तनपान हे मातांच्या तसेच लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. योग्य आहार आणि काळजी घेत प्रत्येक स्तनदा महिलेला स्वतःच्या तब्येतीसह बाळालाही जपावं लागतं. आजारी महिलेने स्तनपान करावं का? त्याचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याबाबत काही गैरसमजही आहेत. 


जगभरात एक ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून घोषित करण्यात आला आहे. स्तनपानाबद्दल जागरूकता पसरवणे हा या मागचा उद्देश आहे. स्तनपानाबद्दल महिलांमध्ये अनेक मिथके आहेत. 


आजारी असताना मातांनी स्तनपान करावे की नाही?


आजारी महिलांना बाळाला स्तनपान करू नये असे गावखेड्यात सर्रास सांगितल्याचे पाहायला मिळते. पण आजाराच्या प्रकारावर अवलंबून स्तनदा माता त्यांच्या बाळाला स्तनपान चालू ठेवू शकतात असं तज्ञ सांगतात. 


बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? 


तुम्हाला योग्य उपचार मिळाल्याची खात्री करणे आवश्यक असून विश्रांती आणि संतुलित आहार घेऊन पुरेसा वेळ गरजेचा आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये तुमचं शरीर तुमचा आजार बरा करण्यासाठी तयार होणाऱ्या अँटीबोडीज तुमच्या बाळाला देत असतं. त्यामुळे बाळाचा आजारापासून बचाव होतो. आईचं दूध हे बाळासाठी अत्यंत पोषक तत्त्वांचा आदर्श स्त्रोत आहे. त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर मोठा फायदा होतो. योग्य आहारामुळे बाळासाठी पुरेसे दूध उत्पादन होण्यास मदत होते. आईच्या आहारात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास दुधाच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.


स्तनपान करणाऱ्या महिलेने काय खावं?


स्तनादामातांनी बाळासाठी कोणत्याही कठोर आहाराचं पालन करण्याची गरज नाही. स्तनपान करणाऱ्या माता जवळजवळ काहीही खाऊ शकतात. बाळाला जर एखाद्या खाद्यपदार्थाचे ऍलर्जी असेल तर ते खाद्यपदार्थ स्तनादामातांनी टाळायला हवेत असं तज्ञ सांगतात. विविध धान्ये, शेंगदाणे, सुकामेवा इत्यादींच्या मिश्रणाचा आहारात समावेश केल्याने पोषक तत्त्वांची विविधता मिळते आणि दुधाचे उत्पादन वाढते. हिरव्या पालेभाज्यांसहया पोषक तत्त्वांनी भरपूर आहारामुळे दुधाचे उत्पादन चांगले होते आणि बाळाला आवश्यक पोषण मिळते.