Health : आजकाल बदलती जीवनशैली, कामाचा ताण, जंकफूडचे मोठ्या प्रमाणात सेवन सारख्या अनेक गोष्टींमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलय. ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूचा कर्करोग हा आजार देखील त्यापैकीच एक आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैली ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ब्रेन ट्यूमर तुम्हाला कोणत्याही वयात बळी ठरू शकतो. याचा धोका महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असल्याचं बोललं जातं. जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करून ब्रेन ट्युमरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी करता येतो. असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


 


जगात ब्रेन ट्युमरचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय


जगात ब्रेन ट्युमरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ब्रेन ट्यूमर ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, जी कोणत्याही वयोगटातील लोकांना बळी करू शकते. त्याची वेळीच ओळख न झाल्यास तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. मेंदूतील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे हे घडते. ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांसह त्याची कारणं जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, तरच आपण या गंभीर आजारापासून बचाव करू शकाल.


 


ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?


ब्रेन ट्यूमर हा मेंदूच्या पेशींचा एक अनियंत्रित समूह आहे, जो सतत वाढत असतो. या ट्यूमरचे दोन प्रकार आहेत. प्रथम सौम्य आहे, ज्यामध्ये मेंदूतील ट्यूमर हळू वाढतात आणि धोकादायक नसतात. दुसरा घातक, यामध्ये ट्यूमर खूप वेगाने वाढतात आणि मेंदूच्या अनेक भागात पसरतात. हा ट्यूमर धोकादायक आणि जीवघेणा आहे.


 


ही लक्षणं तुम्हाला नाही ना?


अशक्तपणा, ताणतणाव, समतोल राखण्यात अडचण, लक्ष केंद्रित न करणे, उलट्या, डोकेदुखी, श्रवणशक्ती किंवा दृष्टी कमी होणे, शारीरिक संतुलन बिघडणे ही ब्रेन ट्यूमरची लक्षणे आहेत. याशिवाय स्मरणशक्ती कमकुवत होणे आणि विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे हे देखील त्याच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे.



आनुवंशिकता


काही प्रकरणांमध्ये, ब्रेन ट्यूमर अनुवांशिक असू शकतात. जर कुटुंबातील एखाद्याला किंवा पालकांना आधीच ब्रेन ट्युमर झाला असेल, तर येणाऱ्या पिढीतही हा आजार होण्याची शक्यता वाढते.



रेडिएशन आणि पर्यावरण


एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार डॉ. शिल्पी मोदी म्हणतात, 'रेडिएशन थेरपी किंवा इतर स्त्रोतांकडून रेडिएशनच्या अधिक संपर्कात आल्याने ब्रेन ट्यूमरचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, काही विषारी पदार्थांच्या संपर्कात आल्याने ब्रेन ट्यूमरचा धोका वाढू शकतो. उदाहरणार्थ, जे लोक रासायनिक कारखान्यांमध्ये काम करतात, त्यांना ब्रेन ट्यूमरचा धोका जास्त असतो.


 


ब्रेन ट्यूमर कोणत्या वयात होऊ शकतो?


ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु सामान्यतः लहान मुलं आणि वृद्ध लोकांमध्ये हे दिसून येते. काही प्रकारचे ब्रेन ट्यूमर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य असतात, जसे की मेनिन्जिओमा.


 


ब्रेन ट्यूमर टाळण्यासाठी काय करावे?


सकस आणि संतुलित आहार घ्या


निरोगी आणि संतुलित आहार घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. ब्रेन ट्युमर टाळण्यासाठी हिरव्या भाज्या, फळे आणि धान्यांचा आहारात समावेश करा.


 


नियमित योगा आणि व्यायाम


नियमित व्यायाम किंवा योगासने केल्याने शरीर तसेच मन निरोगी राहते. ऊर्जा वाढते, लठ्ठपणा कमी होतो. तसेच अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण करते.  



रेडिएशनपासून संरक्षण


अनावश्यक रेडिएशन थेरपी टाळली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यासच रेडिएशन थेरपी घ्या.


 


रसायनांचा कमी वापर


मेंदूचा कर्करोग टाळण्यासाठी, शक्य तितके सेंद्रिय अन्न वापरावे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा. तसेच रसायनांपासून दूर राहा.


 


 


 


हेही वाचा>>>


Women Health : महिलांनो स्वत:लाही जपा, 'या' कारणांमुळे चाळीशीतच जातेय मासिक पाळी, तोटे जाणून घ्या..


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )