Health: आपण अनेकदा पाहतो, शाळेतील तसेच ऑफ़िसच्या डब्यातील पदार्थ, चपात्या, रस्त्यावरील खाद्य पदार्थ सर्रासपणे वर्तमानपत्र, प्लास्टिक, ॲल्युमिनीयम, फॉईलमध्ये गुंडाळले जातात. त्याचा खाद्यपदार्थांवर काय परिणाम होतो तसेच त्याहून अधिक आपल्या आरोग्यावर काय गंभीर परिणाम होतो, याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण यामुळे कळत-नकळत आपण कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण देतो. या संदर्भातील माहिती फुड अथॉरिटीने दिली आहे. जाणून घ्या सविस्तर..
कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण?
खाद्यपदार्थ वृत्तपत्रात बांधले जातात खरे.. मात्र शाईमध्ये अतिशय घातक असे केमिकल असतात. जे बायोएक्टिव्ह असल्याने आपल्या शरीरात गेल्यामुळे त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्रिंटिंगच्या शाईमध्ये शिसे आणि जड धातूंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशा वेळी कागदात अन्न बांधून ठेवल्यास ते रसायन अन्नाच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. FSSAI भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार कागदावर जीवाणू, विषाणू देखील मोठ्या प्रमाणात असतात. हे जीवाणू, विषाणू अन्नात जाऊन त्या आहाराचा तुमच्या आरोग्यावर गंभीर आजार होऊ शकतो. खास करुन पोटाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण होतो.
संशोधनात काय म्हटलंय?
अनेकदा डब्यात दिली जाणारी चपाती, सॅंडविच, तसेच रस्त्यावरील पदार्थ पॅक करण्यासाठी प्लॅस्टिक आणि ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यातूनही घात रसायनं अन्नामध्ये उरतात, त्यामुळे यातील आरोग्याला हानी पोहोचू शकते. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सायन्स यामध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार, अॅल्युमिनियम फॉइलमधून वेगवेगळ्या उत्तेजकांमध्ये, विशेषतः डिस्टिल्ड वॉटरमध्ये तसेच अम्लीय आणि अल्कधर्मी द्रावणात बाहेर पडतात. अन्नात बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतो. म्हणून त्यातील पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
शरीरावर नकारात्मक परिणाम
वर्तमान पत्रात बांधलेले खाद्यपदार्थ खाणे अनेक प्रकारे जीवघेणं ठरू शकतं. कारण वर्तमानपत्रातील शाईमध्ये मल्टिपल बायोअॅक्टिव मटेरिअल असते. ज्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ही शाई शरीरात गेल्यावर कॅन्सरसह इतरही जीवघेणे आजार बळावू शकतात अशी माहिती फुड अथॉरिटीने दिली आहे. आपण आपल्या दैनंदिन दिनचर्यात बहुतांश वेळा पॅकेज केलेले अन्नाचा वापर करतो आणि त्यामुळे सुरक्षित, ताजे व गरम अन्नाचे सेवन करता येते म्हणून ते चांगले, असा भ्रम आपल्या मनात असतो. परंतु ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण बहुतांश खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये प्लास्टिकचे घटक आणि घातक रसायने वापरलेली असतात, जे अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि कर्करोगासारख्या इतर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतात. वर्तमानपत्रे हे अन्न पदार्थ पॅकेजिंग म्हणून वापरण्यासाठी तयार केलेली नाहीत. त्यांचे उत्पादन आणि हाताळणी फूड-ग्रेड पॅकेजिंग मटेरियल्समाणेच स्वच्छता आणि सुरक्षा मानकांचे पालन करत नाहीत. त्यामुळे, त्यांचा वापर करणं म्हणजे आरोग्याला धोका निर्माण करणं होय.
आरोग्य तज्ज्ञ सांगतात...
तळेगाव येथील रेडिएशन आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ ज्योती मेहता सांगतात की, रस्त्यावरच्या गाड्यांवर विकले जाणारे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून ग्राहकांना दिले जातात. वडापाव, भजी, समोसे, भेळ हे खाद्यपदार्थ पेपरमध्ये बांधून विकले जातात. पण वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणारी शाई पोटात गेल्यास आरोग्याला धोकादायक ठरू शकते. पेपरची शाई, त्यातील रसायने सतत पोटात गेल्यास विविध आजारांना आमंत्रण दिले जाते.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो सावध व्हा.. पोटाची चरबी ठरतेय अत्यंत धोकादायक? विविध गंभीर आजारांना आमंत्रण? सद्गुरूंनी सांगितले कारण आणि उपाय
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )