Health: अनेकवेळा असे होते की, हँगओव्हर कमी करण्यासाठी अनेक पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्यामध्ये लिंबू पाणी पिणे, दही खाणे, याशिवाय आंबट पदार्थ खायला दिले जातात. हॅंगओव्हरचा ज्या लोकांना जास्त त्रास होतो, त्यांना अधिक पाणी दिले जाते. कारण असे मानले जाते की, हँगओव्हर कमी होण्यासाठी जास्त पाणी पिणे फायदेशीर आहे. यामुळे मळमळ, डोकेदुखी आणि थकवा यापासून आराम तर मिळेलच. पण हँगओव्हरबाबत केलेल्या एका संशोधनातून एक नवीन गोष्ट समोर आली आहे. ज्यामुळे तुमच्या सवयी बदलतील. जाणून घ्या...


हँगओव्हर कमी करण्यासाठी पाणी पिणं किती योग्य?


हँगओव्हरमध्ये मळमळ, डोकेदुखी आणि थकवा यासारख्या समस्या कमी होण्यासाठी पाणी पिणे हा उपाय मानला जातो. पण तुम्हाला वाटतं तितके ते प्रभावी आहे का? अलीकडेच या संबंधित एक अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये हँगओव्हर कमी करण्यासाठी अधिक पाणी पिण्याच्या कल्पनेचे खंडन करण्यात आले आहे.


नवीन अभ्यास काय म्हणतो?


या अभ्यासात नेदरलँड्समधील उट्रेच विद्यापीठातील संशोधकांकडून दोन गटांवर संशोधन करण्यात आले. ज्यामध्ये पहिल्या गटाने रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान केले आणि नंतर पाणी प्यायले. दुसरा गट मद्यपानानंतर पाणी न पिणाऱ्यांचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दोन्ही गटातील लोक उठले, तेव्हा प्रत्येकाला वेदना, मळमळ आणि थकवा यासारख्या तक्रारी होत्या. पाणी प्यायलेल्या गटाने त्यांची तहान कमी होत असल्याची तक्रार केली, असे असले तरी, हँगओव्हर दोघांसाठी समान होते.


हँगओव्हर पाण्याने बरा होत नाही?


अभ्यासात असे म्हटले आहे की, याचे परिणाम दर्शविते की मद्यपान करताना किंवा नंतर पाणी पिल्याने हँगओव्हर कमी होत नाही. अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जोरिस वर्स्टर यांनी सांगितले की, पाणी न पिल्याने डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण होऊ शकते. परंतु शरीरातील निर्जलीकरण हे हँगओव्हरच्या लक्षणांचे प्राथमिक कारण असू शकत नाही. तुम्ही जितके जास्त मद्यपान कराल, तितके तुम्हाला हँगओव्हर होण्याची शक्यता जास्त असते, असे ते म्हणाले. पाणी प्यायल्याने तहान आणि कोरडे तोंड यापासून आराम मिळतो, परंतु यामुळे डोकेदुखी आणि मळमळ कमी होत नाही.


हँगओव्हरसाठी उपचार काय आहे?


हँगओव्हरच्या उपचारांसाठी, अभ्यासात असे म्हटले आहे की, त्यावर कोणताही उपचार अस्तित्वात नाही. वाढत्या वयानुसार हँगओव्हरची समस्या वाढते हे आकडेवारी आणि संशोधन मान्य करतात. वाढत्या वयाबरोबर लिव्हरच्या समस्याही सुरू होतात. ज्यामुळे हँगओव्हर वाढतो.


हेही वाचा>>>


Health: बिअरमुळे कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? एका नव्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )