Health Care Tips : कामाच्या पद्धती बदलल्यामुळे सध्या नोकरी करणाऱ्या बहुतांश लोकांना 8 ते 10 तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर काम करावे लागते. काम करताना कितीतरी वेळ सलग एकाच जागी नजर खिळलेली असते. यामुळे डोळ्यांवर खूप जास्त ताण येतो. स्क्रिनवरचा प्रकाश कधीकधी डोळ्यांना खूपच बोचतो, खुपतो. पण काम केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे डोळ्यांच्या तक्रारी सध्या खूप जास्त वाढत आहेत. डोळ्यांच्या तक्रारी वाढल्या म्हणजे केवळ चष्माच लागतो असे नाही. तर खूप जास्त स्क्रिन बघितल्यामुळे अनेकांना डोळे कोरडे होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळ्यांना खूप खाज येणे, डोके दुखणे असे वेगवेगळे त्रास जाणवत आहेत.
स्क्रिन पाहिल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी योगासने करायला हवीत. यामुळे डोळ्यांना चांगलाच आराम मिळेल आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल. डोळ्यांच्या फिटनेससाठी करा 'ही' योगासने -1. हलासनडोळ्यांसाठी हलासन अतिशय उपयुक्त आहे. हलासन करणे थोडे कठीण निश्चित आहे, परंतू दररोज योग्य सराव केला तर आठवडाभरातच उत्तम हलासन करता येईल. हलासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. त्यानंतर दोन्ही पाय एकत्रितपणे 90 अंशात वर उचला. यानंतर दोन्ही हात कंबरेखाली घ्या आणि कंबरेचा भाग देखील उचलण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय सावकाशपणे डोक्याच्या मागे घेऊन जा आणि पायाची बोटे जमिनीवर टेकविण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला लगेचच पाय डोक्याच्या मागील भागावर असणाऱ्या जमिनीवर टेकणार नाहीत. पण नियमितपणे प्रयत्न केल्यास हे आसन नक्कीच जमू शकते. एकदा ही आसनस्थिती जमली की त्यानंतर ती 30 सेकंद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा.
2. त्राटकत्राटक हा योग धारणेतील एक प्रकार आहे. दिव्याच्या मदतीने त्राटक करता येते. त्राटक करण्यासाठी दिवा किंवा मेणबत्ती पेटवा आणि ती डोळ्यांच्या अगदी सरळ रेषेत ठेवा. तुमची जेवढी उंची असेल, तेवढ्या फुट लांबीवर दिवा ठेवावा, असे सांगण्यात येते. तुमचे डोळे आणि दिवा एका समान पातळीवर असायला हवा, याची काळजी घ्या. यानंतर ध्यान मुद्रेत बसा. पाठीचा कणा ताठ ठेवून पायाचे अर्धपद्मासन घाला. यानंतर दोन्ही हातांच्या तर्जनीला दोन्ही हातांचे अंगठे लावा आणि अशी मुद्रा घालून हात गुडघ्यावर ठेवा. या ध्यानमुद्रेत बसून समोर दिसणाऱ्या दिव्याच्या ज्योतीकडे लक्ष केंद्रित करा. पापण्यांची हालचाल न करता एखादा मिनीट एकटक दिव्याकडे बघा. यानंतर थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा दोन- तीन वेळा दिव्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे नजर चांगली होते आणि डोळ्यांवरचा ताण हलका होतो.
3. समकोनासनडोळ्यांचे आरोग्य सांभाळण्यासाठी समकोनासन करण्याचा सल्ला दिला जातो. समकोनासन करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर दोन्ही हात वर करा आणि हाताचे तळवे एकमेकांना जोडा. यानंतर कंबरेतून खाली वाका. तुमचे शरीर तुम्हाला 90 अंशात वाकवायचे आहे. दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवा. मान खाली करा आणि डोळे जमिनीवर स्थिर ठेवा. या आसनस्थितीत 30 सेकंद राहण्याचा प्रयत्न करा.
संबंधित बातम्या
डोळ्यांची काळजी घ्या! स्क्रिनटाईम वाढलाय, 'ही' लक्षणं दिसत असतील तर लगेच डोळे तपासा
Weight Loss Drink: हिवाळ्यात इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' ज्युस प्या; झटपट कमी होईल वजन, काय आहे तयार करण्याची पद्धत?
Skin Care Tips : महागड्या क्रीम ऐवजी वापरा 'हे' घरगुती उपाय, त्वचा होईल तजेलदार...
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha