Hand Transplant : जन्मत: दोष असलेला 18 वर्षीय तरुणीवर मुंबईतील (Mumbai) परळमधील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. 13 तासांच्या आव्हानात्मक शस्त्रक्रियेला यश आलं. जन्मजात हँड अॅप्लासिया (हाताचा अविकसित भाग) असलेल्या तरुणीच्या एका हाताचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. डॉ नीलेश सतभाई, सीनियर कन्सल्टंट प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन यांच्या नेतृत्वाखालील ग्लोबल हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमने यशस्वी कामगिरी करत वैद्यकीय इतिहासात आपले स्थान मिळवले. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर 18 वर्षांच्या या तरुणीला आपला हात मिळाला आहे.
गुजरातमधील भरुच येथील सामिया मन्सुरी या 18 वर्षीय तरुणीच्या उजव्या हाताचा पंजा जन्मजात विकसित झाला नव्हता. सामियाला चांगले हात प्रोस्थेसिस मिळेल याची खात्री करण्यासाठी कुटुंबाने सर्वतोपरी प्रयत्न देखीले केले. मात्र ते यशस्वी झाले नाही. त्यांनी जयपूरसह अनेक शहरांना भेट देऊन हाताचे कृत्रिम अवयव शोधले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की हाताचे कृत्रिम अवयव तिला कार्यक्षम हात देऊ शकणार नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी हात प्रत्यारोपणासाठी ग्लोबल हॉस्पिटलमधील डॉ.सतभाईंचा सल्ला घेतला. समुपदेशनाच्या अनेक सत्रांनंतर, डॉ. सतभाई आणि त्यांच्या टीमने सामियाच्या प्रत्यारोपणाची तयारी सुरु केली. तत्पूर्वी ती 18 वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे ठरवले. 18 वर्षांची झाल्यावर, 10 जानेवारी रोजी, सामिया शारीरिक आणि कायदेशीररित्या हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी करण्यास पात्र ठरली होती आणि तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. इंदोरमधील 51 वर्षीय महिलेच्या कुटुंबाने सामियासाठी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि मग हात दान करण्यात आले. मग, हात प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाल्याचे कळताच आणखी विलंब न करता तिला तातडीने ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
जन्मजात हॅण्ड अॅप्लासियामुळे सामियावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
सीनियर कन्सल्टंट प्लास्टिक, हॅण्ड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ नीलेश सतभाई सांगतात की, जन्मजात हॅण्ड अॅप्लासियामुळे प्रत्यारोपण करण्यात आले. अशा प्रकरणातील हात प्रत्यारोपणाबद्दल कोणतेही अहवाल उपलब्ध नाहीत. शस्त्रक्रियेची गुंतागूंत समजून घेण्यासाठी आणि शस्त्रक्रियेसाठी वैध संमती देण्यासाठी, रुग्णाचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. सामियाच्या कुटुंबाने 2 वर्षापूर्वी माझी भेट घेतली होती. उपचारातील सर्व गुंतागुंत जाणून घेतल्यानंतर ती प्रत्यारोपणासाठी खंबीर आणि प्रवृत्त होती. तिच्या अठराव्या वाढदिवशी आम्ही तिची प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली.
कार्यक्षम हात मिळण्यासाठी सुमारे 9 ते 12 महिन्यांचा कालावधी
डॉ सतभाई पुढे म्हणाले, सामियाचा हात पूर्णपणे विकसित झालेला नव्हता. अविकसित अवयवामुळे तिच्या उजव्या हाताच्या सर्व रक्तवाहिन्या, स्नायू, हाडे आणि नसा सर्वसामान्यांपेक्षा लहान होत्या. त्यामुळे शस्त्रक्रिया ही आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची होती. आम्ही हाताच्या कोपराकडील रक्तवाहिन्या आणि नसा त्यांच्या आकाराशी जुळण्यासाठी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. जसजसा मज्जातंतू कार्यरत होईल तसतसे रुग्णाची कार्यक्षमता वाढेल. तिला पूर्णपणे कार्यक्षम हात मिळण्यासाठी सुमारे 9 ते 12 महिन्यांचा कालावधी लागेल. सामियाला घरी सोडण्यात आले असून सर्व वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी याविषयी रुग्ण आणि तिच्या पालकांना माहिती दिली आहे.
सामियाने लेखनासारख्या मूलभूत गोष्टी करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला. सामियासाठी हे वेदनादायक होते कारण लोक अक्षरशः तिच्या हाताकडे बोट दाखवून तिची खिल्ली उडवत असत. इतरांच्या तुलनेत तिची बोटे लहान असल्याने तिला लाज वाटायची. तिने आपल्या सर्वसामान्यांप्रमाणे दोन कार्यक्षम हात असावेत असे स्वप्न पाहिले होते जे आता सत्यात उतरले.
हात प्रत्यारोपणासाठी पात्र होण्यासाठी 18 वर्षे पूर्ण होण्याची अट
ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये हात प्रत्यारोपण करणारी मुंबईतील मोनिका मोरे यांच्याबद्दल प्रत्येकालाच माहिती आहे. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला त्या भेट देण्याचे ठरवले परंतु कोविड कालावधीत ते शक्य झाले नाही. 6 महिन्यांपूर्वी आम्ही रुग्णालयाला भेट दिली तेव्हा आम्हाला प्रत्यारोपणासाठी पात्र होण्यासाठी सामिया 18 वर्षांची होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले. म्हणून, तिच्या अठराव्या वाढदिवशी आम्ही तिला हात प्रत्यारोपणासाठी नोंदणीकृत केले. तिने हसत हसत ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला कारण परत येताना तिला तिचे दोनही हात सर्वसामान्यांसारखेच पाहायला मिळणार होते. ही सर्व प्रक्रिया यशस्वी ठरण्याकरता दात्याते आणि त्यांच्या कुटुंबियांचे विशेष आभार मानतो. सामियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे आभारी आहोत, असं सामियाची आई शेनाझ मन्सुरी यांनी सांगितलं.
18 वर्षांच्या सामियाला नवे आयुष्य मिळाले
हात प्रत्यारोपणाच्या प्रकरणांमध्ये बारकावे आणि अचूक ज्ञान असणे आवश्यक आहे. या ऐतिहासिक हात प्रत्यारोपणाची नोंद झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. जन्मतः दोष असलेल्या 18 वर्षांच्या मुलीला नवे आयुष्य मिळाले आहे. ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे जी रुग्णांना उत्कृष्ट उपचार पुरवण्याचा प्रयत्न करते. ही शस्त्रक्रिया जन्मतःच दोष असलेल्या आणि हात प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. सामियाची प्रेरणादायी कथा ही दात्यांना देखील प्रोत्साहित करणारी असून अवयव दानामुळे एखाद्याला नवे आयुष्य बहाल करता येते याची प्रचिती याठिकाणी आल्याचे ग्लोबल हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विवेक तलौलीकर यांनी सांगितलं.