Fairness Cream Causes Kidney Illness : गोऱ्या रंगाचं आकर्षण आपल्याकडे नवं नाही. गोरं होण्यासाठी जर तुम्ही फेअरनेस क्रीम (Fairness Cream) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही वापरत असलेल्या क्रीममध्ये पारा (Mercury) आहे का हे आधी तपासून घ्या. कारण अकोल्यात (Akola) फेअरनेस क्रीममधील पाऱ्यामुळे तीन महिलांच्या किडनीवर (Kidney) दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं आहे.
20 वर्षीय बायोटेकच्या विद्यार्थिनीने अकोल्यातील तिच्या ब्युटीशियनकडून विकत घेतलेलं लोकल फेअरनेस क्रीम वापरण्यास सुरुवात केली होती. क्रीम वापरण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच लोक तिच्या 'ग्लो' आणि 'फेअर लूक'चं कौतुक करु लागले. यामुळे तिची आई आणि मोठ्या बहिणीने देखील ही क्रीम वापरण्यास सुरुवात केली.
तिघींना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आजाराचं निदान
परंतु त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण 2022 मध्ये काही महिन्यांनंतर त्या तिघींना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा आजार जडला. या आजारात किडनीतील लहान फिल्टर खराब होतात.
ज्या डॉक्टरांनी तिघींना किडनीच्या समस्येचं निदान केलं होतं त्यांनी मुंबईतील परळमधल्या केईएम हॉस्पिटलमध्ये भेट दिली, जिथे त्यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं. काही तासांच्या विचारमंथनानंतर, केईएममधील नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. तुकाराम जमाले आणि अकोल्यातील डॉ. अमर सुलतान या शिक्षक-विद्यार्थ्याच्या जोडीच्या संशयाची सुई एका गोष्टीकडे गेली, ती गोष्ट म्हणजे या तिघींनी शेअर केलेला मेकअप किट.
विद्यार्थिनीच्या रक्तातील पारा पातळी 46
केईएमच्या आयुर्वेद प्रयोगशाळेत क्रीम्ससह विविध वस्तूंच्या चाचण्या केल्याच्या निकालाने डॉक्टरांना धक्का बसला. "या स्किन क्रीममध्ये पाऱ्याची (Mercury) पातळी 1 पीपीएमच्या (पार्ट्स प्रति दशलक्ष) अनुज्ञेय पातळीच्या तुलनेत हजारोंमध्ये होती," डॉ जमाले म्हणाले. या विद्यार्थिनीच्या रक्तातील पारा पातळी 46 होती ज्याची सामान्य पातळी 7 पेक्षा कमी असते.
पारा हा मानवांसाठी विषारी जड धातू असून तो मेलानोसाईट्स, पिगमेंटेशनसाठी जबाबदार असलेल्या पेशींना प्रतिबंधित करु शकते. "क्रिममध्ये पारा जास्त प्रमाणात असल्याने, त्याच्या वापराने त्वचा तर उजळत होती, पण त्याच वेळी त्यांच्या किडनीवर विपरित परिणाम देखील होत होता, असं डॉक्टर म्हणाले.
आई आणि बहिणीचा आजार बरा, तरुणी अजूनही पूर्णपणे बरी नाही
दरम्यान ही विद्यार्थिनी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही पण तिची आई आणि बहिणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. सौंदर्यप्रसाधनांमध्ये असे धातू असणं ही काही नवीन बाब नाही. 2014 मध्ये, दिल्लीस्थित CSE ने 32 क्रीम्सची चाचणी केली होती आणि त्यापैकी 14 क्रीममध्ये जड धातू असल्याचे आढळलं होतं. "अकोला घटना ही हिमनगाचे फक्त टोक आहे," डॉ जमाले म्हणाले.
त्यामुळे तुम्ही जर गोरं होण्यासाठी फेअरनेस क्रीम वापरत असाल, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावत असाल तर त्यामध्ये कोणकोणते घटक वापरले आहेत हे नक्कीच तपासून पाहा. त्यानंतरच त्याचा वापर करा. कारण बाह्य सौंदर्य खुलवण्यासाठी तुम्ही अशा क्रीमचा वापर तर कराल पण त्याचा विपरित परिणाम शरीरातील अवयवांवर होईल, जे कधीकधी जीवावर देखील बेतू शकतं.