Hand-Foot-Mouth Disease : मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) शहरात लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला होणाऱ्या विषाणुजन्य संसर्गाचे (Hand Foot Mouth Disease) प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांना शरीरावर फोड येत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे. आपल्या पाल्यांना मंकीपॉक्सची बाधा तर झाली नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने हात, पाय आणि तोंडाजवळ पुरळ येते, मुलांना ताप येतो. तोंडाला अल्सर देखील होतो. प्रामुख्याने पावसाळ्यात लहान मुलांना होणारा हा आजार डोकं वर काढत असल्याने पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 


- पावसाळ्यात ज्याप्रमाणे विषाणूजन्य संसर्गाची बाधा होऊन ताप, सर्दी, खोकला होतो, त्याचप्रमाणे हा संसर्ग देखील बळावतो 
- मागील 10 वर्षांपासून हा आजार लहान मुलांमध्ये दर पावसाळ्यात होत असल्याचं निरीक्षण  बालरोग तज्ज्ञांचं नोंदवलं आहे.
- पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात या आजाराचे रुग्ण वाढतात, मात्र जुलैपासूनच आजाराची लक्षणे डोके वर काढू लागली आहेत.
- कांजण्यासदृश्य फोड आणि लक्षणे दिसत असल्याने पालकांमध्ये संभ्रम आहे.


हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य आजार लहान मुलांमध्ये जास्त काळ राहत नाही. ताप 3-4 दिवसातच कमी होतो. दुसरीकडे, मंकीपॉक्स हा आजार 2 ते 4 आठवड्यापर्यंत राहतो. मात्र, असं जरी असलं तरी मंकीपॉक्स हा आजार देखील अतिगंभीर स्वरुपाचा नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. अशात लक्षणे जरी काहीशी सारखी असली तरी ती धोकादायक नाहीत. मात्र, अशात कोणतीही लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जात तपासणी नक्की करा. 


हॅण्ड-फूट-माऊथ हा आजार 8-10 वर्षात बळावला : डॉ. पल्लवी सापळे, बालरोग तज्ज्ञ, अधिष्ठाता, जेजे रुग्णालय
या आजाराविषय मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता, बालरोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी सापळे यांनी अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या की, "मंकीपॉक्सने महाराष्ट्रात अजून शिरकाव केलेला नाही. ताप, अंगदुखी, फोड हे बऱ्याच लहान मुलांना होणाऱ्या आजारात साधर्म्य साधतात. कोविडच्या भीतीमधून आपण बाहेर आल्यानंतर लोकांना वाटतंय की आपण पुन्हा त्या दिशेने चाललोय का? पावसाळ्यात काही आजार उचल खातात, कांजण्या येतात, डेंगी येतं. त्यामुळे पालकांना वाटतंय हे मंकीपॉक्स तर नाही ना. हॅण्ड-फूट-माऊथ हा आजार 8-10 वर्षात बळावला आहे आणि लक्षणे देखील मंकीपॉक्ससारखी आहेत. यात ताप येतो, मुलांची चिडचिड होते आणि हाता-पायावर फोड येतात."


पण दुसरीकडे मंकीपॉक्स देखील काही धोकादायक नाही. मात्र जर कोणाला हाता-पायावर फोड आले असतील तर डॉक्टरांकडे जावं. डॉक्टर सांगतील हा कोणता आजार आहे? डेंगी पण वाढला आहे, यात पण लाल चट्टे येतात, काही आजार सीजन बदलतात तेव्हा येतात. 


प्रतिकारशक्ती चांगली असल्यास दोन्ही आजार बरे होतात : डॉ. पल्लवी सापळे,
"लहान मुलांची इम्युनिटी कमी असते त्यामुळे त्यांना असे आजार होतात, त्यांच्यासाठी व्हायरस नवीन असतो. सर्दी, पडसं आहे म्हणून पण दुर्लक्ष करु नका, आजार आहे तर उपचार घ्या. हॅण्ड-फूट-माऊथमध्ये मुल चिडचिडी होतात, अशक्तपणा येतो, तोंडात फोड आल्याने जेवण जात नाही, त्यामुळे योग्य उपचार घेणं गरजेचे आहे. शाळा सुरु झाल्या आहेत, त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. हात धुणे आणि स्वच्छता गरजेची आहे. मंकीपॉक्स 2 ते 4 आठवडे राहतो. तर हॅण्ड-फूट-माऊथमध्ये ताप 4 दिवसानंतर निघून जातो. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर हे दोन्ही आजार बरे होतात," असं डॉ. पल्लवी सापळे यांनी नमूद केलं.