Cholera Outbreak : जगभरातील 22 देश सध्या 'कॉलरा' (Cholera) या आजाराचा सामना करत आहेत. गेल्या काही दिवसांत जगभरातील 1 अब्जाहून अधिक लोकांना 'कॉलरा' हा संसर्गाचा आजार झाला आहे. कॉलराचा प्रादुर्भाव वाढल्याने सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दूषित पाणी किंवा उघड्यावरचे अन्न पदार्थांचं सेवन केल्याने कॉलरा होत असतो.
गेल्या काही वर्षात कॉलराच्या रुग्णसंख्येत घट झाली होती. पण 2022 मध्ये या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून यावर्षीदेखील कॉलराचा प्रादुर्भाव वाढला आहे. यूएन हेल्थ एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, 2022 नंतर कॉलराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. गरिबी, नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदल हे कॉलराच्या प्रसारासाठी जबाबदार घटक आहेत. सुरक्षित पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे कॉलरा होत आहे.
कॉलरावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लस आणि औषधे उपलब्ध आहेत. कॉलराच्या प्रादुर्भावात जागतिक स्तरावर वाढ झाल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले तरीही कॉलराचा प्रादुर्भाव कमी होईल हे लक्षात घेत जागतिक आरोग्य संघटना त्यादृष्टीने अंमलबजावणी करत आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कॉलरा धोकादायक आहे. त्यामुळेच कॉलरामुळे होणारे मृत्यू 90 टक्क्यांनी कमी करणं ही जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे. संशोधनानुसार, कॉलरामुळे दरवर्षी जगभरातील 21,000 ते 1,43,000 रुग्णांचा मृत्यू होतो. आता यावर्षी 1 अब्जाहून अधिक लोकांना कॉलराचा धोका आहे. जगभरातील 22 देशांमध्ये या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार,"मलावी दोन दशकांपासून कॉलराचा सामना करत आहे. मलावीसह इथिओपिया, केनिया आणि सोमालियासह इतर देशांमध्येही कॉलराचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवामान बदलामुळे कॉलराचा संसर्ग होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे स्वच्छ पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे.
संबंधित बातम्या