Fitness: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलंय, अशात बरेच लोक त्यांच्या फिटनेसबाबत अत्यंत जागरुक झाले आहेत.  मांसाहारी पदार्थातून आपल्याला प्रथिने, कॅल्शियम आणि इतर जीवनसत्त्वे जरी मिळत असली तरी आता अनेक लोक शाकाहारी राहणे पसंत करतात, कारण असे म्हणतात की, शाकाहारी अन्न खाल्ल्याने अनेक रोगांचा धोका कमी होतो. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे, जेव्हा आपण आपल्या आहारात अल्कोहोल आणि मांसाचा समावेश करत नाही, तेव्हा आपले शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. याबाबत अभिनेता सोनू सूदने त्याच्या फिटनेसबद्दल सांगितले, ज्यात त्याने आपल्या आहारात शाकाहारी पदार्थांचा समावेश करून स्वत:ला कसे फिट ठेवतो हे सांगितले आहे.


सोनूला आधी कोणत्याही विशेष डाएटबद्दल माहिती नव्हती...


सोनूने सांगितले की, तो दारू आणि मांस अजिबात खात नाही, त्याने हे देखील सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा व्यायाम करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला कोणत्याही विशेष डाएटबद्दल माहिती नव्हती. शाकाहारी असल्याने त्याने सप्लिमेंट्स आणि स्टिरॉइड्सच्या मदतीशिवाय फिटनेस केले. सोनू सूदने एका मुलाखतीत सांगितले की, तो लहान असताना तो रोज अमूल बटरची अख्खी टिक्की खात असे. तो म्हणाला की तो खाण्याबाबत फारसा फूडी नाही आणि जे काही त्याला जेवायला मिळतं ते मोठ्या प्रेमाने खातो.


सोनू सूद फिटनेसबाबत काय म्हणतो?


यूट्यूबवर शुभंकर मिश्रासोबत चॅट करत असताना, सोनूला त्याच्या फिटनेसबद्दल विचारण्यात आले आणि तो म्हणाला की आजकाल भारदस्त शरीर मिळविण्यासाठी अनेकजण सप्लिमेंट्स आणि स्टेरॉईड्सचा वापर करतात. यावर तो म्हणाला की, मी यावर विश्वास ठेवत नाही, मी शाकाहारी आहे आणि मी दारू पीत नाही, मी कधीही नॉनव्हेज खाल्ले नाही. तसेच, मला माझ्या पालकांचा पंजाबी डीएनए वारसा मिळाला आहे. माझे वडील खूप बलवान होते. माझ्या कुटुंबातील मी एकमेव व्यक्ती आहे, ज्याने कधीही दारू किंवा मांसाहाराला हात लावला नाही आणि मी पार्टीही करत नाही.


सोनूला रोज हा पदार्थ खायला आवडतो.


आजकाल अनेक लोक बॉडी बनविण्यासाठी सप्लिमेंट्स घेतात. त्याबाबत सोनू म्हणतो की, मी विद्यार्थी असताना मला प्रोटीन्स आणि कार्ब्स म्हणजे काय हे माहीत नव्हते. मी रोज रात्री अमूल बटर लावलेली रोटी आणि अख्खी टिक्की खायचो. बहुतेकदा तो कच्चे दूध प्यायचा आणि अंड्याचा पांढरा भाग खात असे. सोनू म्हणतो, आजही तो कधी कधी हॉटेल्समध्ये जातो आणि शेफ त्याच्यासाठी खास पदार्थ बनवायला सांगतात, पण तो सॅलड आणि अंड्याचा पांढरा भाग खाण्यास प्राधान्य देतो. तो दररोज डाळभातही खाऊ शकतो असेही सोनूने सांगितले.


सोनू सूद 'हा' आहार घेतो


सोनू म्हणाला, मी वर्षातले 365 दिवस वर्कआउट करतो. हल्ली हल्ली सोनूने चपाती खाणे बंद केले आहे आणि दुपारी एक छोटी वाटी डाळ आणि भात खातो. नाश्तासाठी तो अंड्याचा पांढरा ऑम्लेट, सॅलड, एवोकॅडो, फ्राईड भाज्या किंवा पपई खातो. पण हे सुद्धा तितकंच खरंय, की तो हेल्दी फूड खातो, चीट डे डाएट कधीही घेत नाही.


ही बातमी वाचा : 


Fitness: स्वामी रामदेवांच्या फिटनेसचे रहस्य माहितीय? नंबर 1 फॉर्म्युला अनेकांना माहित नाही..पुरुषांसाठी तर वरदान!


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )