Exam fever 2022 : बदलत्या विज्ञान-तंत्रज्ञानाबरोबर आपल्या सगळ्यांचीच प्रगती होत गेली. अनेक सुविधा यामुळे प्राप्त झाल्या. गोष्टी अगदी सहज हातात उपलब्ध झाल्या. आज इंटरनेटच्या माध्यमातून चक्क एका क्लिकवर आपल्याला हवी ती माहिती पाहिजे त्या वेळेला अगदी सहज सोपी होते. हे जरी खरं असलं तरी मात्र नाण्याची दुसरी बाजू आहेच. एका संशोधनानुसार, असे दिसून आले आहे की, स्क्रीनचा अति वापर केल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण त्याचबरोबर आपण शारीरिकदृष्ट्याही कमकुवत होत जातो.
सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्यामुळे अधिकतर स्क्रिन टाईमचा फटका या मुलांना आणि त्यांच्या पालकांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे स्क्रिन टाईममुळे सोशल इंटरॅक्शन बंद झाल्यामुळे अनेक पालक चिंतेत आहेत. अशा वेळी हा स्क्रिन टाईम नेमका कमी कसा करायचा? यावर पुण्याच्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या डॉ. सुप्रिया मंगेश जाधव यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार काही सोप्या टिप्स आहेत.
परीक्षेदरम्यान मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी पालकांसाठी काही सोप्या टिप्स :
1. संयम पाळा - तुम्ही जरी तुमच्या आयुष्यात तणावग्रस्त आसाल, तरीही मुलांभोवती वावरताना तुम्ही शांत राहणे गरजेचे आहे. सतत चिडचिडपणा मुलांच्या संगोपनावर परिणाम करू शकतो.
2. स्वत:हून स्क्रिन टाईम कमी करा - मुलांना सांगण्याआधी स्क्रिन टाईम कमी करण्याची सुरुवात तुम्ही स्वत:पासून करा.
3. अभ्यास नियोजन तयार करा - परीक्षे दरम्यान विद्यार्थी आधीच तणावात असतात. अशा वेळी मुलांचा तणाव कमी करण्यासाठी त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या अभ्यासात मदत करणे, त्यांचे वेळापत्रक तयार करणे, त्यांचा तणाव कमी करणे गरजेचे आहे. अशाने मुलांना देखील प्रसन्न वाटेल.
4. खेळांसाठी वेळ बाजूला काढा - तुम्ही, पालक म्हणून तुमच्या मुलाचा स्क्रीन टाईम सक्रिय वेळेसह बदलणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे देखील खूप महत्वाचे आहे. तुमच्या मुलाला त्यांचा आवडता खेळ ठराविक वेळेपर्यंत खेळू द्या. हे तुम्हाला परीक्षेदरम्यान तुमच्या मुलाचा स्क्रीन टाइम डिटॉक्स करण्यात मदत करेल.
5. स्क्रीन वेळ, जेवणाची वेळ आणि झोपण्याची वेळ यांच्यामध्ये एक मर्यादा पाळा - खरंतर हा नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. जेवणाच्या वेळी, झोपण्याच्या वेळी शक्यतो मोबाईल. इंटरनेटपासून दूर राहा. या व्यतिरिक्त कुटुंबियांशी, मुलांशी संवाद साधा. अशाने तुमचं नातंही घट्ट होईल.
6. एक आदर्श व्हा - मुलांना उपदेश देण्याआधी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. तेव्हाच तुम्ही तुमच्या मुलांपुढे एक आदर्श ठेवू शकता. लक्षात ठेवा, मुलं आपल्या कृतीचं निरीक्षण करतात त्यामुळे वेळीच सावध राहा.
7. काही पारंपारिक खेळ खेळा - मुलांसोबत साधे खेळ खेळण्याचा प्रयत्न करा ज्यासाठी संसाधनांची आवश्यकता नाही उदा: घरी खजिना शोधणे, प्राण्यांच्या गोष्टींना नाव देणे, शब्दसंग्रह तयार करण्याचा खेळ, नवीन शब्द पास करणे, बाह्यरेखा वरुन एक कथा बनवणे, चित्र चर्चा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- World Health Day 2022 : जागतिक आरोग्य दिन नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
- Health Tips : शरीरात अशक्तपणा जाणवतोय? काळजी करू नका; 'या' 10 पदार्थांचा आहारात समावेश करा
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha