Tea Lower Risk of Death : भारतात चहा (Tea) पिण्याची प्राचीन परंपरा आहे, असं म्हणावं लागेल. कारण येथे बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्यानेच होते. चहाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होतं नाही. दरम्यान, चहा, कॉफीच्या सेवनाचे आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क आतापर्यंत समोर आले आहेत. आता चहा प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होतो, असा दावा करण्यात येतं आहे. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, चहा प्यायल्याने मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. अमेरिकेमधील एका संशोधनाच्या आधारे हा दावा करण्यात येत आहे. यूके बायोबँकच्या संशोधनात असं समोर आले आहे की, जे लोक दिवसातून दोन किंवा अधिक कप काळा चहा पितात त्यांना मृत्यूचा धोका कमी असतो. अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टनुसार, काळा चहाऐवजी दूध किंवा साखर मिसळून चहा पिणाऱ्या व्यक्तींनाही काळा चहा पिणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच मृत्यूचा धोका कमी असतो. यामध्ये जास्त फरक आढळत नाही.


चहा पिणाऱ्या व्यक्तींना मृत्यूचा धोका कमी


अमेरिकेतील या संशोधनानुसार, चहा न पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत चहा पिणाऱ्या व्यक्तींना मृत्यूचा धोका कमी असतो. या अभ्यासानुसार, चहा पिणाऱ्या आणि चहा न पिणाऱ्या लोकांची तुलना केल्यास, जे लोक दररोज दोन किंवा अधिक कप चहा पितात त्यांना मृत्यूचा धोका 9 टक्के ते 13 टक्के असतो. तर चहा न पिणाऱ्या व्यक्तींमध्ये हा धोका वाढतो, असे संशोधकांनी सांगितले. तर मद्यपान करणे म्हणजेच दारु प्यायल्यानेही मृत्यूचा धोका वाढतो. 


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी यूके बायोबँककडून गोळा केलेल्या माहिती वापर करुन निष्कर्ष काढला आहे. यूके बायोबँककडून 40 ते 69 वर्षे वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांवर अभ्यास करण्यात आला. या वयोगटातील संशोधनात समील व्यक्तींपैकी 85 टक्के लोक नियमितपणे काळा चहा पितात. हा अहवाल 2002 ते 2010 साली दरम्यान केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मांडण्यात आला आहे. हा अहवाल 2006 ते 2010 या कालावधीत उत्तर दिलेल्या प्रश्नावलीवर आधारित आहे. या प्रश्नावलीच्या आधारावर एका दशकाहून अधिक काळ याचा पाठपुरावा केला गेला.


काय आहे यामागचं कारण?


अभ्यासात चहा पिणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण कमी का आहे यामागचं कारण काय आहे, हे अद्याप निश्चितपणे सिद्ध झालेलं नाही.


चहा पिण्याचे दुष्परिणाम


दरम्यान, चहा जास्त प्रमाण आरोग्यासाठीही हानिकारक ठरु शकतं. जास्त प्रमाणात चहा प्यायल्यानं पोटदुखी किंवा पचनक्रिये संदर्भातील आजार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे डॉक्टर जास्त प्रमाणात चहा पिणं टाळण्याचा सल्ला देतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या