मुंबई : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज (Rabies) आजाराने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रेबीज हा आजार किती धोकादायक आहे आणि कुत्रा चावल्याने (Dog Bite) तो कसा पसरु शकतो हे जाणून घेणार आहोत. आकडेवारीनुसार, दरवर्षी रेबीजमुळे 18 ते 20 हजार नागरिकांचा मृत्यू होतो. भारतात रेबीजची जवळपास 30 ते 60 टक्के अशी प्रकरणं आहेत, ज्यात 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना जेव्हा कुत्रा चावतो तेव्हा त्याची तक्रार केली जात नाही.


रेबीज म्हणजे काय?


रेबीज हा असा आजार आहे, जो रेबीज नावाच्या विषाणूद्वारे पसरतो. हा आजार मुख्यत्वे जनावरांमध्ये त्यातही कुत्र्यांमध्ये मोठ्या संख्येने आढळतो. जर एखाद्या प्राण्याला हा आजार झाला असेल आणि तो मनुष्याला चावला तर तो त्यांच्यातही पसरतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या जनावरांच्या लाळेत असतो. जर या आजाराने ग्रस्त असलेला जनावर मनुष्याला चावला तर हा विषाणू लाळेद्वारे मनुष्याच्या रक्तात मिसळतो.


रेबीज आजाराची मुख्य लक्षणे?


जर एखाद्या प्राण्याला रेबीजचा आजार असेल आणि त्याने एखादा प्राणी चावला असेल तर त्याची लक्षणे काही दिवसातच दिसू लागतात. दुसरीकडे, रेबीजची काही प्रकरणे अशी देखील आहेत की लक्षणे ओळखण्यास बराच वेळ लागतो. रेबीज या आजाराचे विशेष लक्षण म्हणजे जनावर चावल्यानंतर चावलेल्या भागाच्या आजूबाजूच्या स्नायूंमध्ये मुंग्या येण्यास सुरुवात होते. रेबीजचा विषाणू रक्तात पोहोचतो, त्यानंतर तो मेंदूपर्यंत जातो.


रेबीज रोगाची लक्षणे


तीव्र वेदना


थकवा जाणवणे


डोकेदुखी 


ताप येणे


स्नायूंमध्ये वेदना


चिडचिड होणे


विचित्र विचार येणे


पक्षाघात


जास्त लाळ किंवा अश्रू येणे


तीव्र राग येणे


बोलताना त्रास होणे


कोणावरही हल्ला करणे


कोणत्या प्राण्यांद्वारे रेबीज पसरतो?


रेबीज हा रोज कुत्रे, मांजर आणि माकडांनी चावल्याने पसरतो. जर यापैकी कोणत्याही प्राण्याला रेबीज आजार असेल आणि तो माणसाला चावला तर त्यांनाही संसर्ग होतो.


रेबीजवर इलाज आहे का?


रेबीजवर कोणताही इलाज नसला तरी काही लोक रेबीज झाल्यानंतरही बचावले आहेत. एखाद्या व्यक्तीला रेबीजग्रस्त कुत्रा चावला असेल तर त्याला वेळोवेळी लसीकरण करुन घ्यावे.


लसीकरण


जर तुमच्या घरी पाळीव प्राणी असेल तर वेळोवेळी त्याचे लसीकरण करणे महत्त्वाचं आहे. जेणेकरुन हा प्राणी एखाद्याला ओरबाडला किंवा चावला तरी घरात राहणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमच्या पाळीव प्राण्याचे वेळोवेळी लसीकरण होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.