New Delhi News: ऑपरेशननंतर रुग्णाच्या पोटात डॉक्टरांकडून काही वस्तू विसरुन राहिल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. पण दिल्लीत (Delhi) एक विचित्र घटना घडली आहे. दिल्लीच्या 'सर गंगाराम हॉस्पिटल'च्या (Sir Ganga Ram Hospital) डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून एका व्यक्तीच्या आतड्यातून तब्बल 39 नाणी आणि 37 मॅग्नेट्स काढले आहेत. याबाबत रुग्णाकडे विचारणा केल्यानंतर रुग्णानं दिलेलं कारण ऐकून डॉक्टर्सही हैराण झाले आहेत. 


मीडिया रिपोर्टनुसार, रुग्ण मानसिक आजारानं ग्रस्त होता. रुग्णाला त्याच्या शरीरात झिंकची कमतरता असल्याचं समजले, म्हणून त्याने 39 नाणी आणि 37 चुंबक गिळली. रुग्णाला वाटलं की, नाणी आणि मॅग्नेट्स गिळल्यानं शरीरात झिंक तयार होईल. त्यामुळे त्यानं नाणी आणि मॅग्नेट्स खाल्याचं स्वतः रुग्णानं खाल्लं. दरम्यान, सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये 26 वर्षीय रुग्णाच्या पोटात एक नव्हे तर 39 नाणी आणि 37 मॅग्नेट्स सापडल्यामुळे खळबळ माजली आहे. 


उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यानं डॉक्टरांकडे धाव 


रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण हा मानसिक आजारी असून त्याला नाणी खाण्याची सवय आहे. गेल्या 20 दिवसांपासून रुग्णाला वारंवार उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर कुटुंबीय रुग्णाला रुग्णालयात घेऊन गेले आणि ऑपरेशननंतर नाणी आणि मॅग्नेट्स बाहेर काढण्यात आले. रुग्णाला सर गंगाराम रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णाला काही खायलाही मिळत नव्हतं.


बाह्यरुग्ण विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. तरुण मित्तल यांनी सर्वात आधी रुग्णाला तपासलं. गेल्या काही आठवड्यांपासून रुग्ण नाणी आणि मॅग्नेट्स खात असल्याचं रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितलं. तसेच, रुग्ण मनोरुग्ण असून त्याच्या मानसिक उपचार सुरू असल्याची माहितीही कुटुंबीयांनी दिली. 


एक्सरेमध्ये पोटात दिसली नाणीच नाणी


रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णाच्या पोटाचा एक्स-रे काढला, ज्यामध्ये त्याच्या पोटात नाणी आणि मॅग्नेट्स असल्याचं दिसून आलं. पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये असं दिसून आलं की, नाणी आणि मॅग्नेट्सच्या प्रचंड भारामुळे आतड्यात अडथळा निर्माण होत आहे. रुग्णानं लगेचच शस्त्रक्रियेसाठी होकार दिला.


शस्त्रक्रिये दरम्यान असं कळलं की, मॅग्नेट्स आणि छोटी नाणी आतड्यांच्या दोन्ही बाजूंना जाऊन बसली होती. मॅग्नेटमुळे नाणी आणि आतडी एकमेकांना चिकटली होती. शस्त्रक्रियेदरम्याम डॉक्टरांनी आतड्यातील नाणी आणि मॅग्नेट्स काढले. त्यानंतर दोन्ही आतडी जोडण्यात आली. त्यांच्या पोटाच्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाच्या पोटातून एकूण 39 नाणी (1, 2, 5 रुपयांची नाणी) आणि 37 मॅग्नेट्स (वेगवेगळ्या आकाराचे मॅग्नेट्स) काढण्यात आले. 


शस्त्रक्रियेनंतर, डॉक्टरांनी रूग्णाचे प्री-ऑपरेटिव्ह एक्स-रे काढले, ज्यामध्ये असे दिसून आलं की, सर्व नाणी आणि मॅग्नेट्स काढून टाकण्यात आली आहेत. त्यानं असंही सांगितलं की, रुग्णानं शस्त्रक्रियेदरम्यान साथ दिली. आणि सात दिवसांनंतर रुग्णाला घरी सोडण्यात आलं.