DIY Curly Hair Mask : कुरळे केस अधिक रुक्ष आणि कोरडे (Dry hair) असतात. त्यामुळे कुरळ्या केसांची अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कुरळ्या केसांना पोषण मिळण्यासाठी दर आठवड्यातून किमान दोन वेळ तेल मॉलिश करणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, बदाम तेल, राईचं तेल, एरंडेल तेल अशा कोणत्याही तुमच्या आवडत्या तेलाने मॉलिश करु शकता. पण तेल लावताने तेल नेहमी डबल बॉयलरमध्ये कोमट करुन नंतरच त्यानं तेल मॉलिश करा. याव्यतिरिक्त तुम्ही आठवड्यातून किमान एक वेळा हेअर मास्क वापरून केसांना योग्य पोषण देत मॉश्चराईज करु शकता.


कोथिंबीर हेअर मास्क


केसांसाठी कोथिंबीर फार लाभदायक ठरते. कोथिंबीर केसांना पोषण देण्यासोबतच तुमच्या केसांना चमकदार बनवण्यात मदत करते. कोथिंबीर हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्ही मुठभर ताजी कोथिंबीर घ्या. ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवा. यानंतर पाणी मिसळून या कोथिंबीरीची पेस्ट बनवून घ्या. पेस्ट अगदी घट्ट किंवा अगदी पातळ करु नका. हे तयार झालं तुमचं झटपट कोथिंबीर हेअर मास्क. हे मास्क टाळूपासून पूर्ण केसांवर लावा आणि 40 ते 45 मिनिटे राहू द्या. यानंतर तुम्ही सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. (या हेअर मास्कनंतर केसांना लावल्यानंतर केसांना कोथिंबिरीचा सौम्य वास येण्याची शक्यता आहे.)


मेथी हेअर मास्क


मेथी केसांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मेथी हेअर मास्कचा वापर केल्यास तुमची केस गळतीपासून सुटका होईल. याशिवाय केस तुटणं कमी होऊन केस मजबूत होतील. (टीप - मेथी हेअर मास्कनंतर केसांना लावल्यानंतर केसांमध्ये मेथीची सालं अडकण्याची शक्यता आहे. तुम्ही मेथीची पेस्ट अगदी बारीक करून घ्या किंवा गाळून घेऊ शकता.)


पद्धत 1


मेथी हेअर मास्क बनवण्याची सोपी पहिली पद्धत सोपी आहे. यासाठी तुम्ही एक मुठभर मेथी एक ग्लास पाण्यात भिजत ठेवा. मेथी रात्रभर किंवा चार ते पाच तास भिजू द्या. यानंतर ही मेथी मिक्सरमध्ये वाटून  पाणी मिसळून बारीक पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट म्हणजे तुमचा हेअर मास्क. हे मेथी हेअर मास्क संपूर्ण केसाला लावून 20 ते 25 मिनिटे ठेवा. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवा. तुमचे केस लगेच मुलायम होतील. 


पद्धत 2


दुसऱ्या पद्धतीचं हेअर मास्क बनवण्यासाठी तीन ते चार चमचे मेथी अर्धी वाटी दह्यामध्ये भिजत ठेवा. हे रात्रभर किंवा तीन ते चार तासासाठी भिजू द्या. सकाळी याची पेस्ट बनवून केसांवर लावा. हे हेअर मास्क 30 मिनिटांनंतर केस पाण्याचे स्वच्छ धुवा. याचा किमान तीन ते चार आठवडे वापर केल्यावर तुमच्या केसांची चमक परत येईल.


केळ्याचं हेअर मास्क


केळ्याचा वापर केल्यास केस अगदी चमकदार आणि मुलायम बनतील. या हेअर मास्कच्या अगदी पहिल्या वापरापासूनच तुम्हाला या मास्कचा फायदा जाणवेल. केळ्याचं हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्ही एक केळं घेऊन त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही हेअर मास्क म्हणून वापरून शकता. तुमचे केस अधिक कोरडे झाले असल्यास तुम्ही केळ्याचा पेस्टमध्ये एक चमचा बदाम तेल मिसळू शकता. यामुळे केसांना अधिक पोषण मिळेल. हे हेअर मास्क 30 मिनिटे केंसावर लावा. त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. या हेअर मास्कच्या वापरानंतर तुम्हाला कंडीशनर करण्याचीही गरज भासणार नाही.


मेहंदी आणि दह्याचं हेअर मास्क


मेहंदी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्ही मेहंदीची 15 ते 20 ताजी पानं घ्या. ताजी पानं उपलब्ध नसल्यास बाजारात उपलब्ध सुकलेली मेहंदीची पानंही वापरू शकता. मेहंदी पावडरचा वापर शक्यतो टाळा. कारण त्यामध्ये इतर पदार्थ मिसळलेले असण्याची शक्यता असते. आती ही मेहंदीची पानं अर्धी वाटी दह्यासोबत मिक्सरमध्ये वाटून याची पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट केसांवर 20 ते 25 मिनिटे लावा. नंतर सौम्य शॅम्पूने केसं धुवा. तुमच्या केसांवर वेगळीचं चमक येईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


इतर संबंधित बातम्या