Diwali 2024: दिवाळी म्हटला की आनंदाचा उत्सव, दिव्यांच्या या सणात मोठ्या प्रमाणात फटाकेही उडवले जातात. मात्र दिवाळीनंतर प्रदूषणाची पातळी एकाएकी वाढल्याचं समोर येतं. याचा परिणाम, देशातील काही भागातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. परंतु काही आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करून तुम्ही या विषारी हवेच्या प्रकोपापासून शरीराचे रक्षण करू शकता. जाणून घ्या..


दिवाळीनंतर प्रदूषणामुळे हवा होते विषारी, थेट परिणाम आपल्या आरोग्यावर 


दिवाळीनंतर प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढते, त्यामुळे हवा विषारी होते. तर सध्या दिल्ली आणि नोएडामध्ये वातावरणातील प्रदूषण वाढले आहे. देशाच्या अनेक भागात दिवाळीनंतर प्रदूषणाची पातळी वाढण्याची शक्यता आहे. या विषारी हवेचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, विशेषत: फुफ्फुसे, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवर याचा परिणाम अधिक होतो. प्रदूषणामुळे होणारे आजार टाळण्यासाठी आपल्या आहारातील काही गोष्टींचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरू शकते. या रिपोर्टमध्ये तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून आपल्या शरीराला हानिकारक हवेच्या दुष्परिणामांपासून कसे वाचवू शकता हे जाणून घेणार आहोत.


या 5 गोष्टींचे सेवन केल्याने तुमची फुफ्फुसं निरोगी राहतील


ग्रीन टी -  शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होईल


ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन नावाचे कंपाऊंड शरीरातील हानिकारक घटक काढून टाकते. प्रदूषणामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी या पेयाचे सेवन केले जाऊ शकते. या दिवसांमध्ये दररोज 1-2 कप ग्रीन टीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हे केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवत नाही तर श्वसनाच्या समस्या देखील कमी करते. याशिवाय ग्रीन टी फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त आहे.


हळद - रोगप्रतिकारक शक्ती होईल मजबूत 


हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळतो, जो एक उत्कृष्ट दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट आहे. हे शरीरातील जळजळ कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. दुधात हळद मिसळून प्यायल्यास किंवा भाज्यांमध्ये हळद वापरल्याने दिवाळीनंतर होणाऱ्या प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण मिळू शकते. कर्क्युमिन विषारी कणांशी लढण्याची क्षमता वाढवते आणि प्रदूषणाचे दुष्परिणाम कमी करते.


तुळस आणि आलं - घसा आणि श्वसनमार्ग स्वच्छ ठेवते


तुळस आणि आले या दोन्ही वनस्पती त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे फुफ्फुसांना संसर्गापासून वाचवतात. त्याच वेळी, आले घसा आणि श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तुळस आणि आल्याचा चहा बनवून पिऊ शकता. हे केवळ तुमच्या श्वसनाच्या समस्या कमी करत नाही तर शरीराला विषारी हवेपासून वाचवण्यासही मदत करते.


व्हिटॅमिन सी समृद्ध फळे - हानिकारक घटकांशी लढण्याची क्षमता मिळेल


शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते. याच्या सेवनाने शरीराला हानिकारक घटकांशी लढण्याची क्षमता मिळते. संत्री, लिंबू, पेरू, किवी आणि पपई या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. हे जीवनसत्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत करतेच, पण फुफ्फुसांनाही स्वच्छ ठेवते. व्हिटॅमिन सी असलेली फळे रोज खाल्ल्याने शरीराला प्रदूषणामुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण मिळते.


गूळ आणि मध - शरीरातील हानिकारक घटकांशी लढण्याची क्षमता


प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी गूळ आणि मध हे नैसर्गिक डिटॉक्स आहेत. गूळ शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त आहे. हे फुफ्फुसात जमा झालेले धुळीचे कण साफ करण्यास मदत करते. मध घशाला आराम देण्यासोबतच खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांपासूनही बचाव करते. विशेषत: हिवाळ्यात फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यासाठी गूळ आणि मधाचे सेवन करणे उपयुक्त ठरते. दररोज सकाळी कोमट पाण्यासोबत सेवन करणे देखील फायदेशीर आहे.


 


हेही वाचा>>>


Health: जे सिगारेट ओढत नाहीत, त्यांनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका? 2025 पर्यंत रुग्णसंख्या आणखी वाढणार? अभ्यासातून 'ही' कारणं समोर


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )