Diabetic Neuropathy : मधुमेह... (Diabetes) आज राज्यासह देशभरातील अनेक लोक मधुमेहानं (Diabetes Symptoms) ग्रस्त आहेत. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांनाही मधुमेहानं आपल्या विळख्यात अडकवलं आहे. एकदा मधुमेह झाला की, तो त्या व्यक्तीसोबत त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतो, असं म्हणतात. तसेच, मधुमेह हळूहळू माणसाला आतून पोखरतो, असंही तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जातं. मधुमेहानं ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा सल्ला कायम डॉक्टरांकडून दिला जातो. मग तो आहार असो वा दैनंदिन दिनक्रम. याव्यतिक्त मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या पायांना जपण्याचाही सल्ला दिला जातो.


बऱ्याचदा मधुमेह झालेल्यांना पायांना वेदना होणं, पाय सुन्न पडणं किंवा पायांना सतत जळजळ होणं यांसारख्या समस्या उद्भवतात. याचबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मधुमेहानं ग्रस्त असलेल्यांना अनेकदा शरीरातील नसांना (Nerve) समस्या निर्माण होतात. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, जसजसं एखाद्या व्यक्तीचं वय वाढत जातं, तसतसं त्याच्या शरीरातील साखरेची पातळीही वाढते. शरीरातील वाढलेल्या साखरेच्या पातळीमुळे नसांच्या समस्या उद्भवतात. 


जेव्हा मधुमेह असलेल्या रुग्णांना शरीरातील शीरांच्या समस्या सुरु होतात, तेव्हा त्याला 'डायबेटिक न्यूरोपॅथी' म्हणतात. यामध्ये कालांतरानं मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या शरीरातील अनेक शीरा खराब होतात. म्हणजेच, शरींना सूज येणं, त्या सुन्न होणं किंवा त्यामध्ये रक्त गोठणं यांसारख्या समस्या उद्भवतात. ज्याचा थेट परिणाम मधुमेहींच्या पायांवर होतो. त्यामुळे त्यांना चालताना त्रास होऊ लागतो. पायात तीव्र वेदना होतात. कधीकधी तर पाय अत्यंत सुन्न पडतात. पायांना सतत मुंग्या येत राहतात. अशा परिस्थितीत फक्त औषधं आणि व्यायाम हे उपाय करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो.  


'डायबेटिक न्यूरोपॅथी'मुळे होणारी पायांची जळजळ कशी दूर कराल?  


जर तुमच्या घरात किंवा एखादी जवळची व्यक्ती मधुमेही असेल आणि त्यांनाही पायाचा त्रास सतावत असेल, तर काही घरगुती उपाय करुन पाहू शकता. 


सर्वात आधी, बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात रॉक सॉल्ट घाला. रॉक सॉल्टमध्ये नैसर्गिक मॅग्नेशियम सल्फेट असतं, ज्यामुळे पायांना आलेली सूज कमी होते आणि जळजळ, पायांना होणाऱ्या वेदान देखील कमी होतात. कोमट पाण्यात रॉक सॉल्ट मिसळा आणि त्या पाण्यात तुमचे पाय 20 ते 30 मिनिटं ठेवा. 



आल्याच्या तेलानं मसाज करा


'डायबेटिक न्यूरोपॅथी'मुळे मधुमेहींच्या पायांना सतत जळजळ होत असते. त्यामुळे रुग्णांना अगदी नकोसं होतं. या त्रासापासून काहीशी का होईना सुटका करण्यासाठी तुम्ही आल्याच्या तेलाचा वापर करु शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी आल्याचं तेल हातात घेऊन पायांना मसाज करा. यामुळे पायांना होणारी जळजळ कमी होईल. आल्यामध्ये अँटीइंफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे पायांना होण्याऱ्या जळजळीपासून सुटका करण्यास आल्याचं तेल फायदेशीर ठरतं. 



सफरचंदाचं व्हिनेगर


सफरचंदाचं व्हिनेगर अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी व्हिनेगर उपयुक्त आहे. हे मधुमेह न्यूरोपॅथीवर अत्यंत गुणकारी ठरतं. सर्वातआधी एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात सफरचंदाचं व्हिनेगर मिसळा. आता त्यात तुमचे पाय 20-25 मिनिटं ठेवा. यामुळे तुमच्या पायांच्या नसांना आराम मिळेल आणि तुम्हाला रात्री शांत झोप लागेल. तसेच, जळजळही कमी होईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Spinal Stroke Symptoms: झपाट्यानं वाढतायत स्पायनल स्ट्रोकची प्रकरणं; वेळीच लक्षणं ओळखा, नाहीतर...