Aurangabad Measles Disease: मुंबई शहरात गोवरचा उद्रेक (Measles Disease) पाहायला मिळत असल्याने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा (Health System) देखील कामाला लागली आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेकडून देखील या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे. तर औरंगाबाद महानगरपालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून सुद्धा विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अंगावर पुरळ आणि ताप अशी लक्षणे असलेल्या बालकांच्या लाळेचे व रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत (Laboratory) पाठविण्यात येत आहेत. नोव्हेंबर महिन्यात महापालिकेने 15 जणांचे नमुने राष्ट्रीय संसगर्जन्य प्रयोगशाळेत (एनआयव्ही) पाठविले असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.


मुंबईसह इतर काही शहरात गोवरचा धोका पाहता राज्यभरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर खुद्द आरोग्यमंत्री यावर लक्ष ठेवून आले. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाने एक पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून शहरात गोवरची लस घेणे बाकी असलेल्या बालकांचे सर्वेक्षण केले जात आहे. यासोबतच मनपाच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा वर्कर हेदेखील घरोघरी जाऊन बालकांची तपासणी करीत आहेत. 


संशयित रुग्णांची तपासणी...


औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांच्यावतीने, अंगात ताप आणि अंगावर पुरळ उठलेल्या बालकांच्या लाळेचे व रक्ताचे नमुने घेतले जात असून हे नमुने पुणे येथील संसर्गजन्य प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात येत आहेत. तर 1 ते 18 नोव्हेंबरदरम्यान गोवर साथीच्या संशयित 15 बालकांचे नमुने तपासण्यासाठी पुणे येथील संसर्गजन्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेतून नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या बालकांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


एकूण 238 बालकांना गोवर लस


औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने शहरातील वेगवेगळ्या वार्डात केलेल्या सर्वेक्षण गोवरची पहिली लस न घेतलेले 131 मुलं समोर आले आहे. तसेच दुसरी लस न घेतलेले 177 मुलं असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे पहली आणि दुसरी गोवरची लस न घेणाऱ्या एकूण 308 बालकांपैकी 238 बालकांना गोवर लस देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर उरलेल्या बालकांना देखील लस देण्यात येणार असल्याची देखील माहिती आरोग्यविभागाने दिली आहे. 


Measles Disease : लसीकरण करा अन्यथा गोवर गंभीर होऊ शकतो! कोणत्या वयोगटात अधिक लागण? काय सांगताहेत तज्ञ