Covid-19 Effect on Human Body : कोरोना संपला असं कुठे जगाला वाटत होतं, तोच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने डोकेदुखी वाढली आहे. जगभरात कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटचा कहर वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या JN.1 व्हेरयंटमुळे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ही चिंताजनक बाब आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 


कोरोना संसर्गामुळे शरीरातील इतर समस्यांचा धोका वाढला


आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या नवीन JN.1 उपप्रकारामुळे गंभीर आजारांचा धोका कमी आहे. असं असलं तरी कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. वाढत्या रुग्णांमुळे नवीन व्हेरियंटचा धोका तर वाढत आहेच, पण कोरोना संसर्गामुळे शरीरातील इतर अनेक प्रकारच्या समस्यांचा ही धोका वाढला आहे. कोरोना विषाणू स्वत: मध्ये सातत्याने बदल करत असून अधिक धोका निर्माण होतो.


कोरोना व्हायरसमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम 


कोरोना व्हायरसमुळे मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात हे जाणून घेण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरु आहे. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे की, कोरोनाचा नवीन विषाणू फुफ्फुस-हृदय आणि मेंदूशी संबंधित विकारांसह श्वसनाच्या समस्या वाढवू शकतो. यासंबंधित नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांना आढळलं आहे की, मेंदूच्या कार्यासाठी विषाणूचा संसर्ग गंभीर समस्या असू शकतो.


नवा JN.1 सब-व्हेरियंट अधिक संसर्गजन्य 


कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवीन JN.1 सब-व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहे. दरम्यान, यातील एक दिलासादायक बाब म्हणजे JN.1 सब-व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असला तरी, त्याची लक्षणे सौम्य आहेत आणि या संसर्गातून रुग्ण लवकर बरे होत आहेत. 


कोरोनामुळे स्किझोफ्रेनियाचा धोका


कोरोनामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यासात मेंदूच्या संज्ञानात्मक कार्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल लोकांना सतर्क केलं आहे. या संशोधनाच्या अहवालानुसार, ज्या लोकांना कोरोना संसर्गामुळे मध्यम ते गंभीर आजार झाला आहे, त्यांना स्किझोफ्रेनिया स्पेक्ट्रम आणि सायकोटिक डिसऑर्डर (SSPD) यासारखे आजार होण्याचा धोका जास्त असतो. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये स्किझोफ्रेनियाचा धोका जास्त असल्याचं दिसून आल आहे.


संशोधनात काय आढळलं?


वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आसिफ रहमान यांनी त्यांच्या संशोधनाच्या अहवालाबाबत माहिती देताना सांगितलं की, कोरोना विषाणूच्या ज्ञात न्यूरोट्रॉपिझम म्हणजे मज्जातंतूंचं संक्रमण आणि कोविड-19 संसर्गानंतर मोठ्या मानसोपचार विकारांचा धोक्यात वाढ होत असल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे. 


आतापर्यंत, स्किझोफ्रेनियाची सुमारे 20 टक्के प्रकरणे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून आली आहेत, कोरोना संसर्गाने तरुणांमध्येही याचा धोका वाढला आहे. संसर्गाची सौम्य लक्षणे असलेल्या लोकांना धोका आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती नाही, पण याकडे दुर्लक्ष न करता सतर्क राहणे आवश्यक आहे.


स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?


संशोधकांनी सांगितलं की, कोरोनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये स्किझोफ्रेनियाची समस्या एक मोठा धोका म्हणून समोर येत आहे.स्किझोफ्रेनिया हा एक मेंदूचा गंभीर विकार आहे. स्किझोफ्रेनिया आजारामुळे विचार विकार आणि अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात. या आजारामध्ये एखाद्या व्यक्तीच्या विचार, भावना आणि वागण्याच्या पद्धतींवर देखील परिणाम होतो. स्किझोफ्रेनिया असलेल्या लोकांना वास्तविक जगाशी संपर्क तुटल्यासारखा भास होतो. आपल्यासोबत जे घडत आहे ते खरे नाही, असे या रुग्णांना वाटतं. तसेच, आपल्या कोणीतरी नियंत्रण ठेवतंय असंही वाटतं.