Coronavirus Update : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (New Coron Varaint) कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोना (Covid-19) व्हायरसचा नवीन JN.1 व्हेरियंट (Corona JN.1 Variant) आतापर्यंत देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये पसरला आहे, शुक्रवारपर्यंत सुमारे 619 लोकांना नव्या JN.1 सब-व्हेरियंटचा संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1 सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन प्रकाराचा उपप्रकार आहे, त्यामुळे चिंता जास्त वाढली आहे. ओमायक्रॉन आणि त्याच्या सर्व सब-व्हेरियंचच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे आणि हा विषाणू काळानुसार स्वत:मध्ये बदल करून अधिक शक्तिशाली बनत असल्याचं अभ्यासात आढळलं आहे. ओमायक्रॉन विषाणूचे सर्व व्हेरियंट रुग्णाच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करून संक्रमण सहजपणे वाढवू शकतात. यामुळे याचा संसर्ग वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.


नवा व्हेरियंट लहान मुले आणि वृद्धांसाठी धोकादायक


कोरोनाव्हायरस JN.1 व्हेरियंट जगभरात वेगाने परसत आहे. चीनपासून सुरू झालेली कोरोना महामारी अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या एक ते दीड महिन्यात नवीन JN.1 सब-व्हेरियंट सिंगापूर, अमेरिका आणि भारतासह अनेक देशांमध्ये पसरला आहे. सध्या आढळण्याऱ्या नवीन कोरोना रुग्णांमध्ये JN.1 सब-व्हेरियंटचे रुग्ण सर्वाधिक आहे. यूएस मीडिया अहवालानुसार, नोव्हेंबरमध्ये JN.1 प्रकाराचा प्रसार दर फक्त सात टक्के होता, हा डिसेंबरच्या मध्यापर्यंत 44 टक्क्यांहून अधिक झाला, ज्यामुळे कोरोनाची आणखी एक लाट येण्याची भीती निर्माण झाली आहे.


लहान मुले आणि वृद्धांनाही संसर्ग होण्याचा धोका जास्त


JN.1 सब-व्हेरियंटचा संसर्ग लहान मुले आणि वृद्धांना होण्याचा धोका जास्त आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या लसीकरणामुळे या नवीन JN.1 सब-व्हेरियंटपासून पूर्णपणे संरक्षण मिळते की नाही हे अद्याप अभ्यासात स्पष्ट झालेलं नाही. JN.1 सब-व्हेरियंटवर कोरोना लस नेमकी किती प्रभावी आहे, याबाबत स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे नागरिकांनी दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या सर्व लोकांनी संसर्गापासून स्वतःचं संरक्षण करण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.


संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा पालन आवश्यक


कोरोनाच्या नवीन JN.1 सब-व्हेरियंटपासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे फार महत्वाचे आहे. घराबाहेर पडताना किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा नवीन व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असला तरी याची लक्षणे सौम्य आहेत. संसर्गामुळे मुलांना गंभीर आजारांचा धोका नसला तरी ते नक्कीच वाहक असू शकतात, ज्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढू शकतो. 


लहान मुलांचं संरक्षण कसं कराल?


स्वच्छतेच्या उपायांचे पालन करा, पालकांनी मुलांना विषाणूबद्दल माहिती देऊन त्यांना शिक्षित करा आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी काय करावं लागेल, याचं मार्गदर्शन करा. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालणे आणि हाताची नियमित स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.


'या' गोष्टींचीही काळजी घ्या


जगभरातील अनेक देश नवीन कोविड (COVID-19) व्हेरियंट JN.1 मुळे चिंतेत आहे. जगासह भारतातही नवीन कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय मजबूत करणे आवश्यक झालं आहे. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांसाठी काळजी घेणे जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने ते अधिक असुरक्षित आहेत. मुलांना कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी, त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका, शाळेत जाताना मास्क घालण्याचा आणि हाताच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.