Colorectar Cancer : कर्करोग (Cancer) म्हटलं तर आपल्या अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही, कारण हा एक असा रोग आहे. त्याचे वेळीच निदान नाही केले तर आपल्या जीवावर बेतू शकतो. सध्या जगभरात कॅन्सरची प्रकरणे वेगाने पसरत आहेत. कर्करोगाचे तसे बरेच प्रकार आहेत. पण आता यापैकी कोलोरेक्टल किंवा कोलन कॅन्सरचे (Colorectar Cancer) नाव पुढे येत आहे. हा कर्करोग मोठ्या आतड्यांचा कर्करोग म्हणून ओळखला जातो. कोलोरेक्टल किंवा कोलन कॅन्सर म्हणजे नेमकं काय? याची लक्षणे आणि कारणे काय आहेत? याबाबत सविस्तर माहिती देत आहेत  रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अभिषेक पुरकायस्थ, ते तळेगावातील टीजीएच- ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमधील एक नामांकित डॉक्टर आहेत. जाणून घ्या त्यांनी काय म्हटलंय?



मोठ्या आतड्याचा कॅन्सर : काय आहेत लक्षणे आणि कारणे, डॉक्टर सांगतात...


कोलोरेक्टल म्हणजेच मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा मोठे आतडे [colon] किंवा गुदाशयात उद्भवतो. कोलन किंवा गुदाशयच्या आतील अस्तरावरील पेशींचा एक छोटा समूह कालांतराने कर्करोगात विकसित होऊ लागतो. ज्यानंतर कर्करोगाचा धोका उद्भवतो. डॉक्टर सांगतात, मोठ्या आतड्याचा कर्करोग हा कोलोनोस्कोपी सारख्या नियमित तपासणीद्वारे टाळता येतो.


 


मोठ्या आतड्याच्या कॅन्सरची कारणे
 


फॅमिलीअल एडेनोमॅटस पोलीपोसिस (एफएपी), लिंच सिंड्रोम, गार्डनर्स सिंड्रोम असे या कर्करोगाचे प्रकार आहेत. मोठ्या आतड्याच्या कॅन्सरमध्ये आनुवंशिकता ही महत्त्वाची भूमिका बजावते. उच्च चरबीयुक्त आहार, आहारात हिरव्या भाज्यांच्या सेवनाची कमतरता, विशेषत: स्मोक्ड किंवा जळलेल्या लाल मांसाचा जास्त वापर, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान आणि मद्यपान यासारखे जीवनशैली घटक मोठ्या आतड्याच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. या प्रकारच्या कर्करोगाच्या विकासामध्ये वय महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना जास्त धोका असतो. 


अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या कर्करोगाची लागण होताच आतड्याच्या  जैविक (Microbiom) असंतुलनामुळे दीर्घकाळ जळजळ होऊ शकते. आतड्यांसंबंधी अस्तरांना नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची संभाव्यता वाढते. संशोधनानुसार, वायू प्रदूषण आणि काही रसायनांच्या संपर्कात येण्यासारखे पर्यावरणीय घटक देखील मोठे आतडे आणि गुदाशय मध्ये कर्करोगाच्या वाढीस चालना देण्यासाठी भूमिका बजावू शकतात. ही वैविध्यपूर्ण कारणे समजून घेतल्याने मोठ्या आतड्याच्या कर्करोगासाठी प्रतिबंधक धोरणे आणि वेळीच निदानास मदत होऊ शकते.


 


हा कॅन्सर एक सायलेंट किलर; काय आहेत लक्षणे?


-मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा सायलेंट किलर आहे. ज्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. हा रोग जसजसा वाढतो तसतसे काही लक्षणे दिसू शकतात.


-आतड्यांच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, आतड्याच्या बदललेल्या सवयी जसे की अतिसार किंवा बद्धकोष्ठता, तसेच शौचावाटे रक्त येणे किंवा गुदाशयातील रक्तस्त्राव याचा अर्थ मोठ्या आतड्याचा कर्करोग होऊ शकतो.


-अचानक वजन कमी होणे आणि सतत थकवा ही देखील सामान्य लक्षणे आहेत ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.


-मोठ्या आतड्याचा कॅन्सर असलेल्यांना ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता, पोट फुगणे आणि शौचास जाऊ आल्यानंतरही पूर्णतः मल विसर्जन न झाल्याचे तक्रार जाणवते.


- मलविसर्जनातील बदलाकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. कारण तो मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.


- या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे आणि ते दीर्घकाळ टिकून राहिल्यास तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 


-कोलोरेक्टल कॅन्सर असलेल्या रूग्णांचे परिणाम सुधारण्यासाठी वेळीच तपासणी आणि उपचार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.


 


उपचार काय आहेत?


डॉक्टर सांगतात, या कर्करोगाची वैविध्यपूर्ण कारणे समजून घेतल्याने प्रतिबंधक धोरणे आणि वेळीच निदानास मदत होऊ शकते. याच्या उपचारात शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि टार्गेटेड थेरपी यांचा समावेश आहे. तुमचे डॉक्टर तुमच्यासाठी योग्य उपचार पद्धती ठरवतील. नियमित कोलोनोस्कोपी किंवा इतर शिफारस केलेल्या तपासणी केल्याने कोलोरेक्टल कर्करोग त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोधण्यात मदत होऊ शकते. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि या प्राणघातक कर्करोगाने प्रभावित झालेल्या व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाढवण्यासाठी हे सक्रिय धोरण महत्त्वाचे आहे. असं डॉक्टर सांगतात.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health News : 'काय करू? डाएट, वर्कआउट करूनही वजन कमीच होत नाही', तज्ज्ञांनी सांगितलेले कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल