CM Medical Assistance Cell : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने ( रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळवलं आहे. यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळालं आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थसहाय्य केलं जातं. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या 1 वर्षांत कक्षाकडून 10,500 पेक्षा अधिक गोरगरीब तसंच गरजू रुग्णांना एकूण 86 कोटी 49 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरु केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती.
आतापर्यंत किती मदत दिली?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाख, डिसेंबर महिन्यात 1031 रुग्णांना 8 कोटी 52 लाख, जानेवारी 2023 मध्ये 1060 रुग्णांना 8 कोटी 89 लाख तर फेब्रुवारी 2023 मध्ये 1237 रुग्णांना 10 कोटी 27 लाख, मार्च 2023 मध्ये 1469 रुग्णांना 11 कोटी 95 लाख, एप्रिल मध्ये 1984 रुग्णांना 9 कोटी 93 लाख, मे मध्ये 1329 रुग्णांना 11 कोटी 25 लाख, तर जूनमध्ये विक्रमी 942 रुग्णांना 14 कोटी 81 लाख, रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.
कोणकोणत्या आजारांचा समावेश?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉकलियर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केलं आहे.
संबंधित बातमी