Child Health : प्रत्येक आई आपल्या लहान मुलाचं संगोपन अगदी काळजीपूर्वक करत असते. ज्यामध्ये बाळाला मालिश करणं, अंघोळ घालणं या गोष्टी आल्या, त्यानंतर बाळासाठी विविध वस्तूंचा वापर केला जातो. तुम्ही देखील तुमच्या मुलाला टॅल्कम पावडर लावता का? जर होय, तर सावधगिरी बाळगा, अलीकडील अभ्यासात त्यात असे घटक आढळले आहेत जे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढवू शकतात. टॅल्कम पावडर व्यतिरिक्त, पूर्वीच्या अभ्यासात इतर अनेक कॉस्मेटिक उत्पादने देखील गंभीर रोगांचा धोका वाढवतात. अलीकडेच, अनेक कंपन्यांच्या टॅल्कम पावडरमध्ये एस्बेस्टोस नावाचा घटक असू शकतो अशी चिंता शास्त्रज्ञांनी अभ्यासात व्यक्त केली आहे. संशोधक एस्बेस्टोसला गंभीर रोग वाढवण्याचा मानतात, यामुळे कर्करोगाचा धोका देखील होऊ शकतो.



टॅल्कची चाचणी करणं महत्वाचं


'टॅल्क' हे पृथ्वीवरून काढलेले खनिज आहे. ओलावा शोषून घेण्यासाठी आणि घर्षण कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर मानले जाते, म्हणून कॉस्मेटिक कंपन्या बऱ्याचदा बेबी पावडर, आय शॅडो आणि इतर उत्पादनांमध्ये याचा वापर करतात. त्याचप्रमाणे, एस्बेस्टोस देखील टॅल्क सारख्या खनिजांचा एक समूह आहे. ज्याचे उत्खनन देखील केले जाते. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, एस्बेस्टोसचा वास घेतल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो, संशोधकांनी सांगितले, कॉस्मेटिक कंपन्यांनी खाणकामाची ठिकाणं काळजीपूर्वक निवडणे आणि टॅल्कसाठी नियमितपणे चाचणी करणे महत्वाचे आहे.


 


पावडरमध्ये कार्सिनोजेनिक घटक असू शकतात


शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जे लोक वारंवार पावडर वापरतात, जे त्याचा वास घेतात. यामुळे शरीरात कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने देखील याला कार्सिनोजेनिक म्हणून सूचीबद्ध केले आहे. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, टॅल्कचे खाणकाम आणि प्रक्रिया करणाऱ्या लोकांना या हानिकारक पदार्थांमुळे कर्करोगाचा धोका जास्त असतो. परंतु हे टॅल्कच्या खनिजांमुळे होते की जमिनीखालील इतर गोष्टींमुळे होते हे अद्यापही स्पष्ट नाही.


 


गर्भाशय, पोटाच्या कर्करोगाचाही धोका


टॅल्कम पावडरचे धोके आणि त्यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांवर केलेल्या अनेक अभ्यासांचे मिश्र परिणाम दिसून आले आहेत. संशोधकांनी सांगितले की, टॅल्क विशिष्ट वयोगटातील लोकांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. काही अभ्यासांमध्ये, पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढल्याचे देखील नोंदवले गेले आहे, तरीही याची पुष्टी करण्यासाठी अजून अभ्यास करण्यात येत आहे. संशोधकांचं म्हणणं आहे की, टॅल्क-आधारित पावडर बनवणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांबाबत हजारो खटल्यांचा सामना करावा लागला आहे.


 


कोणती पावडर वापरू नये?


अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने मुलांसाठी कोणत्याही प्रकारची पावडर न वापरण्याची शिफारस केली आहे, मग ते टॅल्क-आधारित असो वा नसो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही प्रकारच्या पावडरचे कण शरीरात गेल्यास मुलांना फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञ म्हणतात की, टॅल्कम पावडर आणि कर्करोग यांच्यातील संबंध 100 टक्के स्पष्ट नाही, परंतु त्यापासून दूर राहणे अधिक सुरक्षित मानले जाते.


 


 


 


हेही वाचा>>>


Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )