World Blood Donor Day 2024 : असं म्हणतात ना, रक्तदानासारखं महान कार्य कोणतंच नाही. कारण रक्तदान केल्याने आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. त्याला जीवनदान देऊ शकतो. त्यामुळे रक्तदानाचे महत्व अत्यंत आहे. अनेक लोक समज-गैरसमज अभावी रक्तदान करत नाहीत. त्यामुळे रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रक्तदानाबद्दल लोकांना जागृत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन जगभरात साजरा केला जातो. आज या दिनाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत, रक्तदान कोण करू शकतो, कोण करू शकत नाही? हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतात 12,000 रुग्णांचा रक्त वेळेवर न मिळाल्याने मृत्यू?
रक्तदानाला महान दान म्हणतात. रक्तदानामुळे अपघात, शस्त्रक्रिया यासारख्या गंभीर परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. एका अहवालात असे दिसून आले आहे की, भारतात दुर्दैवाने दररोज 12,000 रुग्णांचा रक्त वेळेवर न मिळाल्याने मृत्यू होतो. देशाला वर्षाला 15 दशलक्ष (1.5 कोटी) युनिट रक्ताची आवश्यकता असते, तर केवळ 10 दशलक्ष (1 कोटी) युनिट रक्तदान शिबिरं आणि इतर मार्गांनी मिळतात. ही दरी वेळीच भरून काढण्याची व्यवस्था केली नाही, तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच रक्तदानाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण रक्तदानाबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या भीती आणि गैरसमज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्तदानाशी संबंधित या प्रश्नांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
रक्तदान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते?.
रक्तदानाच्या संदर्भात लोकांना हा प्रश्न हमखास पडतो: रक्तदान केल्याने माणूस कमकुवत होतो का? मात्र, आरोग्य तज्ज्ञ याला चुकीचं मानतात. रक्तदान करण्याच्या प्रक्रियेत, प्रामुख्याने लाल रक्तपेशी काढून टाकल्या जातात, ज्या नैसर्गिकरित्या काही दिवसात शरीराद्वारे पुन्हा तयार केल्या जातात. पांढऱ्या रक्त पेशींची पातळी सामान्य होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. परंतु पांढऱ्या रक्त पेशींमध्ये ही तात्पुरती घट रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यक्षमतेवर लक्षणीय परिणाम करत नाही. त्यामुळेच रक्तदान केल्याने अशक्तपणा येत नाही.
टॅटू असलेले लोक रक्तदान करू शकत नाहीत?
टॅटू काढल्यानंतर रक्तदानासाठी तीन महिने थांबावे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण सरकारी परवाना असलेल्या टॅटू पार्लरमधून टॅटू काढले, तरच ही लोक कोणत्याही समस्येशिवाय रक्तदान करू शकतात, कारण टॅटू काढताना वापरलेली उपकरणं एकेरी वापरातील असू शकतात. त्यामुळे टॅटू झाल्यानंतर किमान तीन महिने प्रतीक्षा करणे चांगले आहे.
महिला रक्तदान करू शकत नाहीत?
आरोग्य तज्ज्ञ सांगतात, रक्तदान कोणीही करू शकतो, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. मात्र, जर महिलेची हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल किंवा ती ॲनिमियाने त्रस्त असेल, तर अशा परिस्थितीत रक्तदान करणे योग्य मानले जात नाही. रक्तदान करण्यासाठी, रक्तदात्याकडे 12.5 ग्रॅम हिमोग्लोबिन प्रति डेसीलिटर असणे आवश्यक आहे, जर ते यापेक्षा कमी असेल तर ते अपात्र ठरतात. जर तुम्ही निरोगी असाल आणि तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण ठीक असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
वर्षातून एकदाच रक्तदान करू शकतो?
आरोग्य तज्ज्ञ सांगतात, हे खरे नाही. रक्तदानानंतर रक्तपेशी पुन्हा भरण्यासाठी 8 आठवडे लागतात. यानंतर पुन्हा रक्तदान करणे सुरक्षित असते. अमेरिकन रेड क्रॉसने प्रत्येक 56 दिवसांनी रक्तदान करण्याची शिफारस केली आहे. वर्षातून तीन ते चार वेळा रक्तदान करता येते.
,
हेही वाचा>>>
World Blood Donor Day 2024: ही तर मानवतेची सर्वात मोठी सेवा! रक्तदान महत्वाचे का आहे? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
(टीप : हा लेख वैद्यकीय अहवालांमधून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )